कर्माची फळं!

अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या राममंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त आता जवळ येऊन ठेपला आहे. संपूर्ण देशात सर्वसामान्यांमध्ये सध्या एकच जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेची. एकीकडे अयोध्येतील राममंदिराच्या निर्माणाची आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याची सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना दुसरीकडे प्राणप्रतिष्ठापनेच्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी काहींना निमंत्रण मिळाले तर, काही नेत्यांना निमंत्रणच मिळाले नसल्याने, अनेकांचा भ्रमनिरास झालाय्. काहींच्या तर एवढं जिव्हारी लागलंय् की, या पवित्र कार्यक्रमावरही टीका करण्यापासून राहावल्या गेलं नाही. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना या समारंभाचं निमंत्रण अद्याप दिलं गेलं नसल्यानं, अर्थात ते दिलं जाणारच नाही असा समज करून, या गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे थयथयाट सुरू केलाय्. हा काही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचा राष्ट्रीय कार्यक्रम नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही लक्ष घातलं असतं. राम सर्वांचे आहेत, पण भाजपाने रामाचं अपहरण केलं आहे. असं राजकारण पाहून रामाच्या आत्म्याला त्रास होईल आणि पुन्हा वनवासात जातील, असं कृत्य करू नका. आम्ही असं निमंत्रणाचं राजकारण कधी केलं नाही. अशा पद्धतीचा नेहमीच्या अकांडतांडवकारांनी तांडव करण्यास सुरुवात केली आहे.

गमतीची गोष्ट म्हणजे आज निमंत्रणाची भीक मागू लागलेल्या या गटाचा नेता जेव्हा मुख्यमंत्री होता, त्यांच्या सत्ताकाळात जेव्हा म्हणजे 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार होते, तेव्हा महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याने भूमिपूजनाचा विरोध केला होता. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला दिला होता. त्यांना आता निमंत्रणाची वाट न पाहता ई-दर्शन घेण्यात किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी होण्यास काही हरकत नसावी? मुख्यमंत्रिपदाचा पूर्ण कार्यकाळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकार चालवणार्‍यांनी, मंत्रिमंडळाच्या बैठकादेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार्‍यांना, सारं काही घरी बसूनच करण्यात धन्यता माणणार्‍यांना आता कशाला अयोध्येला जायचंय्… घरी बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दर्शन घेऊनच धन्यता मानावी.

एवढेच नव्हे, उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कुठल्याही प्रकारचा आनंद साजरा न करण्याच्या नोटिशी रामभक्तांना पोलिसांकरवी पाठविल्या होत्या. या नोटिशीत कुठल्याही प्रकारचे जल्लोष, विजय मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी, शुभेच्छा फ्लेक्स बोर्ड लावणे या व्यतिरिक्त भूमिपूजनाच्या अनुषंगाने सोशल मीडियावर होमहवन, सामूहिक पूजा असले कुठलेही कृत्य करू नये, अशी तंबी दिली होती. याला न जुमानता आनंद साजरा करणार्‍या रामभक्तांवर उद्धव ठाकरेंच्या सरकारने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले होते. केवळ विशिष्ट समुदायाच्या मतांच्या लांगूलचालनासाठी महाराष्ट्राच्या या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी हा प्रताप केला होता. आणि हे लोक शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांना ढोंगी हिंदुत्ववादी म्हणतात. मुळात, पोलिसांसमोर साधूंच्या झुंडबळीची घटना झाली तेव्हा मूग गिळून बसणारे, हनुमान चालीसा म्हणणार्‍यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलिस कोठडीत पाठविणारे, अमरावतीत जिहादच्या नावाखाली, धर्माच्या नावावर झालेल्या हत्याकांडाला दरोड्याचं स्वरूप देणारे, दारूची दुकानं सुरू करून मंदिरं बंद ठेवणारे, अजान स्पर्धा भरवणारे, मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजाला विरोध करणार्‍या करिश्मा भोसलेवर हल्ला करणार्‍या विशिष्ट समुदायाच्या लोकांना पाठीशी घालणारे, मलाडच्या उद्यानाला टीपू सुल्तानचं नाव देणारे, औरंगजेब नावाच्या सैनिकाचा दाखला देत औरंगजेब मुसलमान असला तरी तो आमचा भाऊ आहे, असे म्हणत औरंगजेबाचा उदोउदो करणारे की शरजिल उस्मानीसारख्या पुण्यात हिंदू विरोधी हेट स्पीच देणार्‍याला पळवून लावणारे, हेच खरे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत.

नागेश दाचेवार