काँग्रेस कधीच यापुढे सत्तेत येणार नाही; अशोक चव्हाण यांचा घणाघात

नांदेड: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सभा, मेळावे घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचार सभेत नेते मंडळी एकमेकांवर खास आपल्या शैलीत टीका करताना दिसत आहे. अशातच भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण एका सभेत विरोधकांवर टीका करताना म्हणाले, यापुढे काँग्रेस कधीच केंद्रात सत्तेत येणार नाही. काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आले असून, माझा भाजपात येण्याचा निर्णय योग्यच होता.

अजून पाच वर्षे मी काँग्रेसमध्ये असतो, तर बोंबलत बसलो असतो. लोकांच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, माझ्या मनातदेखील दुसरे कोणी असण्याचे कारण नाही. त्यामुळे मी हा धाडसी निर्णय घेतला. काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वच उरलेले नाही, पक्षाला नेते टिकवता येत नाही. उरलेसुरले नेते पक्ष सोडून जात आहे. भविष्याच्या काहीही योजना नसलेला पक्ष म्हणून काँग्रेसची गणना होत असल्याचे चव्हाण म्हणाले.