मुंबई : लोकसभा निवडणुकीतील यशामुळे विधानसभेला सामोरे जाताना, महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, ठाकरे गटाने विधानसभेसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करून आघाडीच्या एकजुटीत मिठाचा खडा टाकल्याचे मानले जाते. ठाकरे गटाच्या मागणीमुळे आघाडीत अस्वस्थता पसरली. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच, हा चेहरा उद्धव ठाकरे यांचा असावा, अशी आग्रही मागणी संजय राऊत यांनी केली होती;
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन सर्व काही आलबेल आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याची घाई झाली आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांना दुजोरा मिळत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात उद्धर ठाकरे यांनी आताच्या आता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा? मी पाठिंबा देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु त्यावेळीही काँग्रेस अन् शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दखल घेतली गेली नाही. हाच प्रश्न ‘टीव्ही ९ मराठी कॉन्क्लेव्ह’मध्ये भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी, दोन्ही पक्षांचे उद्धव ठाकरे यांना समर्थन नसल्याचे म्हटले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची भेट घेण्यासाठी तीन दिवस दिल्लीत होते. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांचे नाव घोषित व्हावा ही अपेक्षा होती. परंतु ते तीन दिवस दिल्लीत बसले. त्यावेळी सोनिया गांधी यांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा फोटोही जाहीर होऊ दिला नाही. तीन दिवसांत मुख्यमंत्रीपदाबाबत काही झाले नाही. म्हणजेच काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवली.तसेच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही हे जाहीर केले. नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याची री ओढली. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मविआच्या मनात नाही, हे निश्चित आहे.