जमशेदपूर: काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोच्या नेत्यांना विकासाची पर्वा नाही. त्यांचा संबंध केवळ भ्रष्टाचार आणि खोटे बोलण्याशी आहे. राहुल गांधीची भाषा माओवाद्यांना पुरस्कृत करणारी आहे. त्यामुळेच काँग्रेसशासित राज्यांत गुंतवणूक करण्यास उद्योजक ५० वेळा विचार करतात.
अशा शब्दांत रविवारी पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभेतून विरोधकांवर हल्लाबोल झारखंडच्या जमशेदपूर येथील प्रचारसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, काँग्रेस आणि झामुमोने आपल्या घरात काळा पैसा साठवून ठेवला आहे. घराणेशाहीच्या राजकारणातून समोर आलेले लोकसभा मतदारसंघाला वडिलोपार्जित मालमत्ता मानतात. साठ वर्षे सत्तेत असूनही त्यांच्या धोरणांमुळे देशातील अनेक भाग मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला.
काँग्रेसच्या शासनकाळात १८ हजार गावांची स्थिती १८ व्या शतकासारखी होती. काँग्रेसचे शहजादे उद्योगपतींच्या विरोधात बोलतात, धमक्या आणि इशारे देऊन नक्षल्यांसारख्या भाषेचा सर्रास वापर करतात. उद्योजकांना ते देशाचे शत्रू मानतात. त्यामुळे आजही काँग्रेसशासित राज्यात उद्योजक गुंतवणूक करण्यास धजावत नसल्याचा आरोप मोदी यांनी केला