मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बिस्कीट फेकल्यानंतर तुमची काय अवस्था झाली याबद्दल भूमिका स्पष्ट करा, असा हल्लाबोल भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वबळावर विधानसभा निवडणूका लढवण्याची घोषणा केल्यावर राऊतांनी टीका केली होती. यावर आता राणेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
नितेश राणे म्हणाले की, “राज ठाकरेंना डबल ढोलकी बोलण्याआधी संजय राऊतांनी स्वत:च्या पक्षाची हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट करावी. ते कधी हिंदुत्वाच्या बाजूने बोलतात तर कधी त्याच्या विरोधात बोलतात. २०१९ च्या आधी तुमच्या पक्षाची काय भूमिका होती आणि २०१९ नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बिस्कीट फेकल्यानंतर तुमची काय अवस्था झाली, याबद्दल आधी भूमिका स्पष्ट करा आणि मग दुसऱ्यांवर टीका करा,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “मोदीजींना स्पष्ट बहुमत नाही. ते स्वत:च्या ताकदीवर पंतप्रधान झालेले नाहीत, असं संजय राऊत म्हणतात. पण उद्धव ठाकरे स्वत:च्या पक्षाच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले होते का? त्यांनी राज्यात १४५ पेक्षा जास्त आमदार स्वत:च्या ताकदीवर निवडून आणले होते का? त्यावेळी हे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर आले, स्वत:चे आमदार टिकवू शकले नाहीत आणि आता आमच्या केंद्रातील सरकारवर टीका करताहेत. त्यामुळे संजय राऊतांनी स्वत:ची लायकी ओळखावी,” असेही ते म्हणाले.