औरंगाबाद : कंपनीत वाद घालून सुपरवायझरची हत्या करून फरार झालेल्या तरुणाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. सोमेश सुधाकर इधाटे (वय २७ वर्ष, रा. शिरोडी खुर्द, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) असं आरोपीचं नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, फेब्रुवारी २०१९ मध्ये आरोपी इधाटे हा वाळूज परिसरातील श्री इंजिनियरिंग या कंपनीत जाऊन तेथील सुपरवायझर जगदीश प्रल्हाद भराड (वय ३५ वर्ष, रा.कळंबेश्वर, जि. बुलढाणा) याचा खून करून फरार झाला होता. एमआयडीसी वाळूज पोलीस, गुन्हे शाखेसह विविध पथके त्याचा शोध घेत होती. मात्र तो विविध ठिकाणी जाऊन स्वत:ची ओळख लपवत फिरत होता.
पोलीस पथकाने अनेकवेळा त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना यश आलं नाही. मात्र त्याच्या मूळ गावी पोलीस नजर ठेऊन होते. दरम्यान तो त्याच्या गावात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी फुलंब्री तालुक्यातील शिरोडी गावात सापळा रचला. आरोपी सोमेश येताच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तब्बल पाच वर्षानंतर खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे.