नंदुरबार : कापूस बियाण्याच्या विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास जिल्हा कृषी विभाग कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.नंदुरबार जिल्ह्यात खरीप २०२४ हंगामास सुरुवात होत असल्याने जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र स्तरावरुन कापूस बियाण्याच्या विशिष्ट वाणांची शासनाच्या कमाल किमतीपेक्षा वाढीव दराने विक्री करू नये, असे जिल्ह्यातील तमाम निविष्टा विक्रेत्यांना सूचित करण्यात येत आहे.
असे केल्यास नाशिक विभाग नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशाने संबंधित कंपनी व विक्री करणाऱ्या दुकानावर कडक कारवाई करण्यात येईल, असेह जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्राद्वारे शेतकरी बांधवांना कळविले. जिल्ह्यातील काही अधिकारी कर्मचारी तथा बियाणे निरीक्षक हे छुप्या पध्दतीने गस्त घालत आहेत. व भरारी पथकदेखील कार्यान्वित झाले आहे.
ज्या ठिकाणी अशा पध्दतीने जादा दराने विक्री होण्याच्या संशय आहे. अशा दुकानातून कापूस बियाणे विक्री केलेल्या शेतकऱ्यांची यादी घेऊन ग्राम स्तरावर पडताळणी करण्यात येईल.जादा दराने विक्री आढळून आल्यास संबंधित कृषि सेवा केंद्रावर महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री, व विक्रीच्या किमतीचे निश्चित करण्याच्या विनियम) अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
याबाबत कंपन्यांचा सहभाग आढळून आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनीविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नाशिक विभाग नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.