जळगाव : रस्त्याच्या बाजुला पार्किंग केलेल्या कारची तोडफोड करत नारळ विक्रेत्यासह त्याचे साथीदारांनी डॉ. निरज चौधरी (33) तसेच त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोळे यांना मारहाण केली. रविवार 29 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिरजवळ निलकमल हॉस्पिटलजवळ ही घटना घडली.अर्जुन राठोड, सोनू चव्हाण अशी संशयितांची नावे असून नारळ विक्रेत्याची आई महिला पोलीस असून त्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमुद आहे.
डॉ. निरज चौधरी यांचा स्वत:चा नित्यसेवा नावाचे शहरात हॉस्पिटल आहे. रविवारी निलकमल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ.चौधरी तसेच त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे असे तिघे डॉ.चौधरी यांची कार क्र.एम.एच. 19 सीएफ 5628 ने सकाळी 9.45 वाजता निलकमल हॉस्पिटलला आले. रस्त्याच्या बाजूला कार पार्किंग करीत डॉ.चौधरींसह तिघे जण हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. त्यानंतर नारळ विक्री करणारा विक्रेत्याने त्याची लोटगाडी कारजवळ आणली. त्यानंतर कारची तोडफोड केली. प्रकार कळताच डॉ.चौधरी कारकडे आले असता नारळ विक्रेता तसेच त्याचा एक साथीदार असे दोघे अचानक धावत येत त्यांनी डॉ.चौधरी यांची कॉलर पकडली. अजय सेनानी, मंगेश दांगोळे या दोघा सहकाऱ्यांनी दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एका संशयिताने लोटगाडीवरील कोयता हातात घेत मंगेश दांगोडे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यात दांगोडे यांच्या हाताला दुखापत झाली. नारळ विक्रेत्याच्या आईने डॉ.चौधरी यांना शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांशीदेखील संशयितांनी हुज्जत घातली. याप्रकरणी डॉ.चौधरी यांनी अर्जुन राठोड, सोनू चव्हाणसह महिलेविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.