भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोला सुमारे १७ वर्षांपूर्वी प्रक्षेपित केलेल्या कार्टोसॅट-२ या उच्च क्षमतेच्या छायाचित्र उपग्रहाला पृथ्वीच्या वातावरणात आणण्यात यश आले. यानंतर त्याला हिंद महासागरात पाडण्यात आले.बुधवारी दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी या उपग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर तो महासागरात पडला. त्याचे अवशेष शोधून काढणे अशक्य असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
१० जानेवारी २००७ रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याचे वजन ६८० किलोग्रॅम होते. त्याला पृथ्वीच्या कक्षेत आणण्यासाठी नियंत्रित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला; जेणेकरून कोणतेही नुकसान व्हायला नको. उच्च क्षमतेची छायाचित्रे काढण्यासाठी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता. विकास कार्यातही उपग्रहाची मोठी मदत झाली होती.
या उपग्रहाचे आयुष्य केवळ पाच वर्षांचे होते. मात्र, अंतराळात त्याने १२ वर्षे कार्य केले. या उपग्रहाला २०१९ मध्ये निष्क्रिय करण्यात आले होते. तेव्हापासूनच त्याने काम करणे बंद केले होते. हाय रिझॉल्युशन इमेजिंग सॅटेलाईट मालिकेच्या दुसऱ्या पिढीतील हा पहिला उपग्रह होता. त्याला सूर्याच्या सममालिक धृवीय कक्षेत स्थिर करण्यात आले होते. २०१९ पर्यंत त्याने आपले कार्य अतिशय उत्तमरीत्या पार पाडले, असे इस्रोने म्हटले आहे.
नुकसान टाळण्यासाठी निर्णय
कार्टोसॅट-२ हा उपग्रह ३० वर्षांनंतर नैसर्गिक पद्धतीने पृथ्वीवर परत येईल, अशी वैज्ञानिकांना आशा होती. त्यात अजूनही इंधन शिल्लक होते. त्याच इंधनाचा वापर करून त्याला नियंत्रित पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात आणण्याचा निर्णय वैज्ञानिकांनी घेतला, जेणेकरून या निष्क्रिय उपग्रहामुळे अंतराळात कोणत्याही प्रकारचे नुकसान व्हायला नको आणि अंतराळ केंद्रासाठीही तो धोकादायक बनायला नको, असे इस्रोने नमूद केले