काश्मीरमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, 3 पिस्तूल-6 मॅगझिन आणि 5 किलो स्फोटकांसह 3 संशयितांना अटक

अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांकडून शस्त्रसाठा सापडला आहे. याशिवाय ५०० ग्रॅम हेरॉईनही जप्त करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई करून दहशतवाद्यांच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे.

 

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी अमली पदार्थांसह दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. सुरक्षा दलांनी शनिवारी तीन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हेरॉईन, शस्त्रे, दारूगोळा आणि अनेक प्रतिबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एक व्यक्ती हेरॉईन विकण्यासाठी खरेदीदार शोधत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने उत्तर काश्मीर जिल्ह्यातील कर्नाह भागात संयुक्त कारवाई केली.

५०० ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉईन जप्त
पोलिसांनी सांगितले की, दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५०० ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. खावरपरब कर्नाह येथील शफीक अहमद शेख आणि बागबल्ला येथील तारिक अहमद मलिक अशी संशयितांची नावे आहेत.

३ पिस्तूल, ६ मॅगझिन आणि ५ किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत
त्यांच्या टोळीत आणखी एका व्यक्तीचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. परवेज अहमद पठाण, रा. साधपुरा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पठाणला पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त छाप्यात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तीन पिस्तूल, ७६ काडतुसे, सहा मॅगझिन आणि सुमारे पाच किलोग्राम संशयित स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. सर्व संशयितांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

आतापर्यंत 50 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे
काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे पथक सर्वांचा शोध घेत आहे. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ५० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.