किती दिवस रेटणार खोके-गद्दारीचे राजकारण?

तरुण भारत लाईव्ह । २१ जून २०२३ । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही चालले आहे, त्याची इतिहासातली नोंद काळ्या शाईतलीच असेल. पक्ष कोणताही असो, त्यातील वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज पार बिघडवून टाकला आहे. या सा-यांमुळे जनतेचे करमुक्त मनोरंजन होते आहे, यावर मानायचे तर समाधान मानता येणे शक्य आहे.   पण, महाराष्ट्राच्या राजकीय चर्चा-संवादाचा पोत हिंदी पट्ट्यातील काही कुप्रसिद्ध राज्यांच्या स्पर्धेत उतरणे खरोखर चिंताजनक आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि सत्तांतर घडून आले. त्या पृष्ठभूमीवर गेले वर्षभर गद्दारी, खोके एवढेच विषय महाराष्ट्रात चर्चेत आहेत. वर्ष झाले तरी हे विषय संपलेले नाहीत. आता उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक शिवसेनेने खोके दिन साजरा करण्याची तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वाभिमान दिन पाळण्याची घोषणा केली आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दार दिन घोषित केला आहे. शिल्लक शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात बोलताना, शिवसेना हा धक्काप्रूफ पक्ष असल्याचे म्हटले आणि भाजप हा उद्धवग्रस्त पक्ष असल्याची टीका केली.  इकडे गर्दी आहे आणि तिकडे गारदी आहेत, असे ते म्हणाले आणि महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकावू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा कार्यक्रम मुंबईतल्या गोरेगावात झाला. उद्धव ठाकरे हेच गद्दार असल्याची टीका करीत त्यांनी मर्यादेत राहावे, असा इशारा शिंदे यांनी दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव ठाकरे यांना गद्दार असे विशेषण लावले आणि त्यांच्या मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द ही कुंभकर्णी झोपेची होती, अशी टीका केली. खरे तर सा-याच राजकारण्यांना खोक्याची सवय आहे, असा सामान्य माणसांचा समज आहे आणि तो खोटा म्हणण्याची सोय राजकारणातील बहुतांशी मंडळींनी ठेवलेली नाही. आलिशान-चकचकीत अद्ययावत गाड्या, दिमतीला माणसांची-सेवकांची फौज, विदेशी झुंबर लावलेले मोठाले बंगले, विदेशवा-या, हौसमौज, तारांकित हॉटेलांमधले सोहळे हे सारे लोकप्रतिनिधींना रीतसर मिळणा-या वेतनातून होऊच शकत नाही. तरीही ते सारे लोकांना दिसते आणि लोक त्याचा योग्य तो अर्थ काढतात. सामान्यांना राजकारणाची शिसारी येते ती अशा गोष्टींमुळे ! एकीकडे देशाच्या एका भागात महापूर आला आहे. दुसरीकडे मान्सूनची प्रतीक्षा सुरू आहे. लोकांचे प्रश्न कायम आहेत. पण, दुसरीकडे राजकारण्यांचा बारमाही शिमगा. उद्धव ठाकरे तर नेहमीच कहर करतात. वास्तवात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा करणारे उद्धव ठाकरेच होते. बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या वळचणीला आपला पक्ष बसविला नाही. तो दिवस उगवला तर आपण राजकारण सोडून देऊ, अशी त्यांची भूमिका होती.

उद्धव ठाकरे यांनी मात्र सत्तेच्या हव्यासापोटी तीन दशकांची शिवसेना-भाजपा युती मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांशी आघाडी करून तीन पायांचे सरकार स्थापन केले. भाजपा आणि शिवसेना ही युती नैसर्गिक होती. ती जुनी आणि लोकमान्य होती. तिला हिंदुत्वाचे, मराठी माणसांच्या कल्याणाचे आणि प्रसंगी आवश्यक असलेल्या आक्रमतेचे अधिष्ठान होते. याउलट काँग्रेस म्हणा वा त्यासारखा कोणताही पक्ष म्हणा, त्यांचा विचार हा अल्पसंख्यकांच्या तुष्टीकरणाच्या कलाने जाणारा आणि हिंदुत्वाला विरोध करणारा. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करणे अनैसर्गिकच होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राने भाजपासोबतची युती म्हणून कौल दिला होता. उद्धव ठाकरेंच्या हव्यासामुळे त्यांनी हा कौल धुडकावून लावला आणि ते स्वत: मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवण्याच्या वल्गना त्यांनी केल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे यांचे ते स्वप्न आहे, असे ते म्हणत राहिले. politics in Maharashtra पण, ते स्वतःच त्या पदावर बसले. त्याबद्दल त्यांच्याच पक्षात खदखद होती. उद्धव ठाकरे यांचा प्रशासकीय अनुभव शून्य होता. साधा नगरसेवक म्हणून काम न केलेली व्यक्ती एकदम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसली तेव्हा राज्याचे वाटोळे होणे सुरू झाले. दरबारी राजकारण करणे आणि राज्य चालविणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचेच लोक भेटू शकत नव्हते. शेवटी व्हायचे तेच झाले. त्यांचा पक्ष फुटला आणि त्यांची सत्ता गेली.

पक्ष हातचा गेला आणि चिन्हही गेले. महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस यांचे सरकार आले.  आता झाले ते झाले. त्यावर थयथयाट तरी किती करायचा, याला काही मर्यादा असली पाहिजे. आता महाराष्ट्राच्या सत्ताकारणात उद्धव ठाकरे यांची शिल्लक सेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. विरोधी पक्षाची खरी ताकद सरकारवर टीका करण्यात नव्हे तर सरकारला काम करण्यास भाग पाडण्यात असते. पण, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे सारेच शिलेदार केवळ टीकाटिप्पणीवर दिवस काढत आहेत. गद्दार, खोके यासारख्या मुद्यांचाच वारंवार उल्लेख करीत आहेत. वर उल्लेखिल्याप्रमाणे राजकारणाच्या सामाजिक सेवेच्या पडद्याआड काय-काय चालते, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे.  पण, उद्धव ठाकरे यांना असे वाटते की, आपण गद्दारी, खोके यांचा उल्लेख करून स्वतःला निष्कलंक सिद्ध करू शकतो. अर्थात, असे काहीही घडण्याची शक्यता नाही. कारण पब्लिक सब जानती हैं. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने आता तरी तोच तो सूर आळवणे बंद केले पाहिजे. राजकीय चर्चा आणि संवादाला विधायक वळण देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षांएवढीच विरोधकांचीदेखील असते, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राजकीय चर्चेत-संवादात विचारांची देवाणघेवाण, धोरणात्मक चर्चा आणि समाजाच्या भल्यासाठी विचार होणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रात अगदी अलीकडच्या काळापर्यंत लोककल्याणाच्या विषयावर पक्षातीत विचार होत असे. अलीकडच्या काही वर्षांत राजकीय चर्चेच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे. ही घसरण संधिसाधू आघाड्यांचा उदय आणि आरोपांच्या राजकारणावर आणि अपमानास्पद भाषेवरील अवलंबित्व यातून निर्माण झाली आहे. संधिसाधू आघाडी म्हणजे महाविकास आघाडीचा उदय ही महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचा पोत खालच्या पातळीवर जाण्यास कारणीभूत ठरलेली प्रमुख घटना होय. सत्ता आणि अल्पकालीन फायदे मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्या आघाडीत सहभाग घेतला. लोकांच्या हितापेक्षा स्वतःच्या हितांना प्राधान्य दिले. फूट पडली तर आपला पक्ष त्यांनी नव्याने बांधायला सुरुवात करायला हवी होती. गळती अजूनही थांबलेली नाही. पण, स्वतःच्या पक्षाची पडझड सुरू असूनही मोदी-शाह-फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा मोह उद्धव ठाकरे यांना आवरत नाही. निमित्त असेल तर राजकारणात टीकाटिप्पणी केली जातेच. पण, निमित्त असो वा नसो; ते त्यांना निरंतर शेलकी विशेषणे बहाल करीत असतात.

त्याचे उत्तरही स्वाभाविकतः तसेच मिळते. परिणाम होतो तो असा की, अशा प्रकारच्या विशेषणांच्या आदान-प्रदानात राज्याचे महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडतात. सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर अत्यंत निरर्थक आणि निराधार वक्तव्यांचा अकाली पाऊस पडत असतो. अशाप्रकारच्या भाषेचा अतिवापर लोकांना आवडत नाही, पण लोक बोलत नाहीत.  कारण सारेच एका माळेचे मणी आहे, हे लोकांना कळते. एक काळ असा होता की, महाराष्ट्राने अनेक बाबतीत देशाला दिशा दिली. रोजगार हमी योजनेसारख्या अनेक योजना महाराष्ट्रातून देशात गेल्या. ग्रामीण रस्ते बांधणीचे किंवा उड्डाणपुलांच्या बांधकामाचे प्रयोग महाराष्ट्रामुळे देशभर पोहोचले. महाराष्ट्र हे आजही अनेक बाबतीत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर असलेले राज्य आहे. ते यापुढेही आघाडीवर राहू शकते. गरज आहे ती राजकारणातील चर्चेचा स्तर सुधारण्याची आणि त्यासाठी खोके आणि गद्दारीच्या मुद्यांवर राजकारण किती काळ रेटायचे हे एकदाचे ठरवण्याची.