मुंबई : केंद्र सरकारचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखावून जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. केंद्र सरकारने कांदा, सोयाबिन आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी खाद्यतेलाच्या आयातीवर कुठलेही शुल्क नव्हते. यावर आता २० टक्के आयात शुल्क लावण्यात येणार आहे. तर रिफाइंड तेलावरील शुल्क १२.५० टक्क्यांहून ३२.५० टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबिन उत्पादक शेतकऱ्याला मोठा फायदा होणार आहे. तसेच बाजारात सोयाबिनच्या किमती वाढण्याकरिताही मोठा फायदा होणार आहे. यापूर्वीच केंद्र सरकारने सोयबिन खरेदीचा निर्णयदेखील घेतला आहे. त्यामुळे सोयाबिन उत्पादक शेतकऱ्याला मोठा लाभ होणार असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळणार आहे.”
“केंद्र सरकारने कांद्याची किमान निर्यात किंमत ही पूर्णपणे संपवली असून कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरुन २० टक्क्यांवर आणली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव स्थिर होण्याकरिता मोठा फायदा होईल. यासोबतच बासमती तांदळाच्या निर्यात शुल्कसुद्धा पूर्णपणे मागे घेण्यात आला आहे,” असे म्हणत त्यांनी या निर्णयासाठी केंद्र सरकारचे आभार मानले. तसेच अशा प्रकारचा निर्णय निश्चितपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखावून जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.