केजरीवाल यांना इंडिया आघाडीची खंबीर साथ; ३१ मार्च रोजी महारॅलीचे आयोजन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली होती. अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष एकजूट झाले आहे. या अटकेचा निषेध करण्यासाठी रविवार ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता इंडिया आघाडीच्या पक्षांनी दिल्लीतील रामलीला मैदानात महारॅलीचे आयोजन केले आहे.

दरम्यान, शनिवारी अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश जस्टिस मनमोहन यांच्या कोर्टाने केजरीवाल यांच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार दिला. ईडीच्या रिमांड विरोधात त्यांनी शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी तातडीची सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती.