जळगाव : जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृह बॅरिकेट क्रमांक १ ते ४ आणि ९ ते १२ येथे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैदी यांच्यात जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात सुरुवातीला किरकोळ वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर दोन गटात हाणामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात आली.
या दगडफेकमध्ये सचिन सोमनाथ गायकवाड (३० रा. सबजेल जळगाव) हा बंदीवान कैदी जखमी झाला आहे तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह किंवा जिल्हा कारागृहात दाखल झाले होते. मात्र याबाबत जिल्हा पोलीस ठाणे मध्ये कोणती तक्रार किंवा लेखी अर्ज देण्यात आलेला नाही.