कोजागीरीला अनुभवा खंडग्रास चंद्रग्रहण

जळगाव :  कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहणाचा अद्भूत खगोलीय नजारा बघण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. यानंतर तब्बल दोन वर्षांनी 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण बघण्याची संधी मिळणार आहे. 28 ऑक्टोंबरला रात्री 11 वाजून 31 मिनिटांनी चंद्र आधी पृथ्वीच्या विरळ सावलीला स्पर्श करेल. त्यानंतर हळूहळू तो गडद सावलीच्या दिशेने जाईल. 29 ऑक्टोंबरच्या सकाळी 1 वाजून 05 मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीला स्पर्श करेल आणि खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होईल.  चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीच्या अगदी काठावरून जात असल्याने सकाळी 1 वाजून 44 मिनिटांनी चंद्राचा फक्त 6% भागच ग्रासला जाईल त्यामुळे हे ग्रहण आपल्याला खंडग्रास स्वरूपात दिसेल. वेळ जाईल तसा तो गडद सावलीतून विरळ सावलीत जायला लागेल. सकाळी 2 वाजून 22 मिनिटांनी चंद्र पुर्णपणे विरळ सावलीत आलेला असेल. त्यानंतर 3 वाजून 56 मिनिटांनी चंद्र विरळ सावलीतून बाहेर निघेल आणि चंद्रग्रहण संपेल.

28 ऑक्टोंबर रोजी रात्री 11 वाजून 31 मिनिटांनी सुरु झालेले चंद्रग्रहण 29 ऑक्टोंबरच्या सकाळी 3 वाजून 56 मिनिटांपर्यंत चालेल. संपूर्ण ग्रहण हे एकूण 4 तास 25 मिनिटांचे असेल आणि मुख्य खंडग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी 1 तास 17 मिनिटांचा असेल. थोडक्यात या कालावधीत चंद्र पृथ्वीच्या गडद छायेत असेल.

 असे होते चंद्रग्रहण 

पृथ्वी ज्यावेळी सूर्य आणि चंद्र याच्या मध्ये येते त्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण होते. अवकाशात पृथ्वीच्या दोन सावल्या पडतात. गडद सावली आणि विरळ सावली. चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा (आयनिक वृत्त) यांच्यात 5 अंशाचा कोन आहे. चंद्राची कक्षा आयनिक वृत्ताला दोन ठिकाणी छेदते त्या बिदूंना राहू आणि केतू असे म्हणतात. चंद्राच्या कक्षेत आणि आयनिक वृत्तात असलेल्या कोनामुळे आणि हे दोन्ही बिंदूही स्थिर नसल्याने प्रत्येक पौर्णिमेला चंद्र यातल्या एका बिंदूवर असतोच असे नाही. ज्यादिवशी पृथ्वी आणि सुर्य यांना जोडणाऱ्या रेषेवर राहू किंवा केतू हे बिंदू असतांना तेथे चंद्र आला तर तो पृथ्वीच्या दाट सावलीत  जातो आणि खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळते.

थोडक्यात असे कि जोपर्यंत सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि हे दोन बिंदू पैकी एक, एकसमान प्रतलात येत नाही तोपर्यत कोणतेही ग्रहण बघायला मिळत नाही. ज्यावेळी तो या बिंदूंच्या फार वर किंवा फार खाली असतो त्यावेळी तो पृथ्वीच्या विरळ सावलीतून जातो या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण  म्हणतात.  ज्यावेळी तो या बिंदूंच्या थोडा वर किंवा खाली असतो. त्यावेळी चंद्राचा काही भागच दाट सावलीतून जातो. यावेळी होणाऱ्या ग्रहणाला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात.