युरोपियन देश आणि चीनमधील लोकांच्या तुलनेत कोरोनाचा भारतीयांच्या फुफ्फुसांवर सर्वाधिक दुष्परिणाम झाला आहे, अशी माहिती नवीन अभ्यास संशोधनातून समोर आली आहे. या विषयाचे संशोधन तामिळनाडूच्या वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने केले आहे.
या अभ्यासात कोरोनानंतर भारतीय रुग्णांच्या फुफ्फुसाचे कार्य बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामधून बरे झालेल्या भारतीय रुग्णांमध्ये फुफ्फुसाचे कार्य लक्षणीय प्रमाणात बिघडलेले होते आणि अनेक महिन्यांपर्यंत त्याची लक्षणे दिसून आली होती, असे ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने प्रकाशित केलेल्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे तसेच युरोपियन आणि चिनी लोकांच्या तुलनेत भारतीयांच्या फुफ्फुसांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे आढळले.
कोरोनानंतर फुफ्फुसाचा संसर्ग झालेल्या लोकांना सामान्य स्थितीत येण्यासाठी साधारण एक वर्षाहून अधिक काळ लागला, तर काहींना दीर्घकालीन फुफ्फुस संसर्गाला सामोरे जावे लागले असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. हा अभ्यास देशातील सर्वात व मोठा अभ्यास म्हणून ओळखला – जातो. यात २०७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेदरम्यान आयोजित केलेला हा अभ्यास अलिकडेच प्लोस या ग्लोबल पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे