कोलकाता-राजस्थान सामन्याच्या तारखेत बदलाची शक्यता

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ची राजस्थान रॉयल्स विरुद्ध १७ एप्रिल रोजी होणाऱ्या आयपीएल लढतीच्या वेळापत्रकात बदल होणे जवळपास निश्चित झाले आहे कारण या दिवशी रामनवमी आहे आणि त्यामुळे पुरेशी सुरक्षा देण्यास स्थानिक पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) ही माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली आहे.

बंगालमध्येही सात टप्प्यांतील सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. कोलकातामध्ये १ जून रोजी मतदान होणार आहे. कोलकाता पोलिसांनी सीएबीचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा सामना रामनवमीला होत आहे आणि निवडणुकीसाठी सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे १७ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरवणे आम्हाला शक्य होणार नाही. कॅबने सामना एक दिवस अगोदर १६ एप्रिलला घ्यावा किंवा १८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याची सूचना केली आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, कॅबने आम्हाला कळवले आहे की स्थानिक पोलिसांनी तारीख बदलण्यास सांगितले आहे आणि हे प्रकरण विचाराधीन आहे. आम्ही अद्याप नवीन तारखेचा निर्णय घेतलेला नाही. कॅबच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही १६ किंवा १८ एप्रिल या दोन तारखा सुचवल्या आहेत. केकेआरसाठी हा घरचा सामना आहे आणि तो ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.