कोळशाची आयात आता कमी, निर्यात; देशाच्या उर्जा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण बदल!

नवी दिल्ली : कोळशाची आयात कमी करून निर्यातीला जास्त प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याकरिता निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी परिवर्तनशील उपक्रम हाती घेत कोळसा मंत्रालयाने देशाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे. देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवणे, ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे आणि कोळसा क्षेत्राच्या वाढीला मदत करणे हे या धोरणात्मक उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, २०२३-२४ या वर्षात कोळसा उत्पादनात ११.६५ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली आहे. ज्यातून कोळसा उत्पादनात स्वयंपूर्णता दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी १,०८० दशलक्ष टनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे प्रमुख कोळसा उत्पादक म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत होणार आहे. विशेष म्हणजे कोळशाची आयात कमी करण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी, एक आंतर-मंत्रालय समिती स्थापन करण्यात आली आहे.

समिती आयातीला पर्याय असलेल्या संधी शोधण्यासाठी विविध मंत्रालयांमध्ये चर्चा आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार असून देशांतर्गत उत्पादित कोळशाच्या वापराला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. देशाला आंतरराष्ट्रीय कोळसा बाजारपेठेतील प्रमुख देश म्हणून स्थान मिळवून देणे, महसूल निर्माण करणे आणि या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या उपक्रमाचा उद्देश असणार आहे.