खड्ड्यात पडून मयत झालेल्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल; दोन महिन्यांनी प्रक्रिया

नंदुरबार : तळोदा रोडवरील राजसिटीसमोर खड्यात दुचाकी वाहन घसरून शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना १९ जुलै रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली होती. जखमी शिक्षकाचा गेल्या महिन्यात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून शिक्षकाने हयगयीने वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बाळू जगन्नाथ सावंत (५७), रा. प्लॉट क्रमांक १०७, कल्याणी रेसिडेन्शिअल, नंदुरबार असे मयत शिक्षकाचे नाव आहे. बाळू सावंत हे १९ जुलै रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास (एमएच ३९ एके २१३७) नंदुरबार येथून घराकडे जात असताना खड्यामध्ये दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला होता. अपघातात सावंत यांना मानेला गंभीर दुखापत झाल्याने अर्धांगवायूचा झटका आला होता. यातून त्यांच्यावर उपचार सुरू असताना ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता.

घटनेच्या १ महिन्यात पोलिसांनी अपघाताचा तपास करून शिक्षकावरच गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई येलवे यांच्या फिर्यादीवरून मयत शिक्षक बाळू जगन्नाथ सावंत (५७) यांच्याविरोधात स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव करत आहेत.

रस्ता उखडला…
तळोदा रोडवर जागोजागी पडलेले खड्डे गेल्या वर्षभरापासून नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. यात शिक्षकाचा बळी गेल्यानंतर संताप व्यक्त होत होता. घटनेच्या महिनाभरानंतर मयत शिक्षकावर गुन्हा केल्याच्या प्रक्रियेने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नंदुरबार ते पथराई फाट्यापर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे.