खरे शिक्षक होणे सोपे नाही !

समाजात आई-वडिलांप्रमाणेच शिक्षकांनाही देवाचे रूप मानले जाते. शिक्षक हे त्याग, समर्पण आणि न्यायाची अशी धगधगती मशाल आहेत, जे विद्याथ्र्यांना यशाचा मार्ग उजळून टाकण्यासाठी स्वतःला पेटवून घेतात.  विषयाभिमुख, कुशल, मार्गदर्शक, दूरदर्शी, संशोधक, विश्लेषक, मृदुभाषी, सहकारी, शिस्तप्रिय, वक्तशीर, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, समर्पित, सेवाभावी आणि मेहनती हे खऱ्या शिक्षकाचे मुख्य गुण आहेत. द्वेषपूर्ण वागणूक, लोभ, गर्व, देखावा, नशा, भ्रष्टाचार यापासून दूर राहून, कठीण परिस्थितीतही हार न मानता समाजातील नवीन पिढीला आदर्शवान बनविण्यासाठी शिक्षक नेहमीच उत्साही असतात.

जात, धर्म, रंग, उच्च-नीच, लिंगभेद यांसारख्या विचारांपासून अलिप्त राहून एक खरा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडे त्याच नजरेने पाहतो ज्याप्रमाणे आई आपल्या सर्व मुलांकडे समानतेने पाहते. देशात, समाजात, जगात शिक्षक हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे.  नवीन पिढीला कर्तव्यदक्ष सुजाण नागरिक बनवण्याची कला शिक्षकाकडे आहे. शिक्षकाच्या कलागुणांवरच देशाचे उज्ज्वल भवितव्य घडते आणि हीच खरी शिक्षकाची ओळख असते.  आज समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती झपाट्याने वाढली असून शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होताना दिसतात.

सभ्यता, मूल्ये, संस्कार उघडपणे धुडकावले जातात. आज आपण खूप सुशिक्षित होत असलो तरी सुसंस्कृत का नाही? शिक्षणाचे व्यापारीकरण सर्वत्र दिसून येत आहे. आजच्या आधुनिक काळात, शहरे आणि महानगरांमध्ये शिक्षण संस्थेचे नाव एक ब्रँड बनले आहे. सर्व पालकांना आपल्या मुलांना नामांकित खाजगी शाळांमध्येच शिकवायचे आहे. मग उत्तम शाळा असूनही मुलांना बाहेरच्या कोचिंग सेंटरमध्ये का पाठविले जाते, असे प्रश्नचिन्ह निर्माण होते.  चांगल्या खासगी शिक्षण संस्थांमध्ये मुलांना शिकवले जात असतानाही पहिलीपासूनच मुलांना बाहेर शिकवणी देणे आवश्यक मानले जाते.

विद्यार्थ्यांचे पोषाख, पुस्तके, वह्या, स्टेशनरी, दप्तर, म्हणजेच शिक्षणाशी संबंधित सर्व साहित्य खरेदीचे नियमही अगोदरच ठरलेले असतात आणि वर्षभर वेगवेगळे उपक्रम-कार्यक्रम चालूच असतात. जगात लोकसंख्येच्या बाबतीत आपला भारत देश अग्रक्रमावर धावत असून सर्वात जास्त शैक्षणिक संस्था असणाऱ्या देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी दरवर्षी आपल्या देशातील विद्यार्थी मोठ्या संख्येने परदेशात शिक्षणासाठी जातात; त्यासोबतच देशाचा मोठा पैसाही बाहेर जातो. गुणवत्तेबाबत बोलायचे झाले तर जागतिक स्तरावरील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये भारताचे नाव नाही.

युनेस्कोच्या शैक्षणिक अहवाल २०२१ नुसार देशातील एक लाख शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरोशावर चालतात. देशातील शाळांमध्ये ११.१६ लाख पदे रिक्त आहेत. त्यापैकी ६९ टक्के ग्रामीण भागात आहेत तर देशातील उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शिक्षण विभागात घोटाळ्यांचा ध्वनी अनेकदा ऐकायला मिळतो. कुठे, कोणत्या पदासाठी, कोणत्या कामासाठी, किती दर निश्चित केले आहेत? हे बहुतेक त्या क्षेत्राशी संबंधित लोकांना माहीत असते, पण प्रत्येक जण आपापल्या फायद्यासाठी किंवा भीतीपोटी डोळे मिटून राहतो. एखाद्या शिक्षकाने अन्याय, भ्रष्टाचार करून नोकरी मिळवली, अन्यायकारक काम केले, तर तो आपल्या पदाला न्याय कसा देणार? आणि त्याला आदर्श पिढीचे शिल्पकार कसे म्हणता येईल?

डॉ. प्रीतम भि. गेडाम