खलिस्तानी दहशतवादी ‘पन्नू’ने कॅनडातील हिंदू खासदारला दिली धमकी; म्हणाला, “तू भारतात…”

ओटावा : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडाच्या लिबरल पक्षाचे खासदार चंद्रा आर्य यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. चंद्र आर्य यांनी कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरून खलिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध केला होता, तेव्हा गुरपतवंत सिंग पन्नूने त्यांना कॅनडाचे नागरिकत्व सोडून भारतात परतण्यास सांगितले होते. पन्नूने देश सोडण्याची धमकी दिल्यानंतर खासदार आर्य यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूला उत्तर देताना आर्य यांनी म्हटले आहे की, कॅनडाच्या मानवी हक्काच्या मसुद्याने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून खलिस्तानी कॅनडाच्या मातीत विष कालवत आहे. कॅनडातील एडमंटन शहरातील BAPS स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि भिंतीवर वादग्रस्त घोषणा लिहिल्या गेल्या. या हल्ल्याचा आरोप खलिस्तानी दहशतवाद्यांवर करण्यात आला आहे. खासदार चंद्रा आर्य यांनी याबाबत निवेदन जारी केले होते, ज्यावर पन्नूने त्यांना देश सोडण्याची धमकी दिली होती.

कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी X वर पोस्ट करून खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूला धमकी दिल्याबद्दल त्याचा निषेध केला आहे. त्यांनी X वर लिहिले, ‘मी एडमंटनमधील BAPS स्वामीनारायण मंदिराची तोडफोड आणि कॅनडात खलिस्तानींनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. माझ्या निषेधाच्या प्रत्युत्तरात, शिख्स फॉर जस्टिसचे गुरपतवंत सिंग पन्नूने मला आणि माझ्या हिंदू कॅनेडियन मित्रांना धमकावणारा व्हिडिओ जारी केला आहे आणि त्यांना भारतात परत जाण्यास सांगितले आहे.

आर्य यांनी पुढे लिहिले की, “आम्ही हिंदू जगाच्या विविध भागातून कॅनडामध्ये आलो आहोत. दक्षिण आशियाई देशांव्यतिरिक्त, आम्ही आफ्रिका आणि कॅरिबियन देश आणि जगातील इतर अनेक भागांतून येथे आलो आहोत आणि आम्ही येथे भाडेकरू नाही. कॅनडा हा आपला देश आणि आपलीच भूमी आहे. कॅनडाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात आम्ही खूप सकारात्मक योगदान दिले आहे. आताही करत आहोत आणि करत राहू.”

आर्य यांनी पन्नूला हिंदू संस्कृतीविषयी माहिती देताना लिहिले की, “हिंदू संस्कृती आणि वारशाचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या हिंदू समुदायाने कॅनडाची बहुसांस्कृतिक बांधणी मजबूत करण्याचे काम केले आहे. हे खरे आहे की अलीकडच्या काळात, खलिस्तानी अतिरेक्यांनी कॅनडाने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून आमची भूमी दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे.”