पारोळा : पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात काम करून गुजराण करणाऱ्या गरीब कुटुंबातील नऊ वर्षीय चिमुकलीवर २८ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना पारोळा तालुक्यात रविवार, १० रोजी दुपारी दीडला घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात संशयित हिरालाल अमरसिंग बारेला (२८, चोपडा तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील एका शेतात रविवार, १० मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नऊ वर्षीय पीडितेवर संशयित हिरालाल अमरसिंग बारेला याने अत्याचार केला, तर पीडितेच्या भावाला लिंबू घेण्यासाठी बाहेर पाठविले. हा प्रकार पीडितेने आईला सांगितल्यानंतर पीडितेसह आईने पारोळा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहे.