जळगाव : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात रविवार, 26 रोजी जोरदार अवकाळी पाऊस झाला. वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत होत घरांचे व पिकांचे नुकसान झाले आहे. तर झाडांच्या फांद्या तुटण्यासह काही ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडलीत.
नंदुरबारला नुकसान
गेल्या 24 नोव्हेंबरपासून खान्देशात ढगाळ वातावरण होते. दोन दिवसानंतर नंदुरबारला दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे विविध ठिकाणी झाड्यांच्या फांद्या तुटून हवेत उडण्यासह मुळासकट झाडे उन्मळून पडलीत. झाडांमुळे काही ठिकाणी वीजेचे खांब वाकले तर वीज वाहक ताराही तुटल्यात. यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. तर अनेक घरांची पत्रे उडून जाण्यासह गोठ्याचे छत कोसळलीत. यासोबत पिकांचेही नुकसान झाले आहे.
धुळ्यातही हजेरी
धुळे जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या वेळी विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांना फायदा होणार असला तरी शेतात असलेल्या कापूस व मळणीसाठी असलेल्या पिकाचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
जळगावात सायंकाळी सातच्या सुमारास हजेरी
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसास सुरवात झाली. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून त्या वीज वाहक तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. तर पावसाची सुरवात होताच वीज कंपनीने वीज पुरवठा बंद केला. वातावरण निवळताच वीज पुरवठा सुरळीत झाला. तर चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात पेरणी झालेल्या रब्बी पिकांना मोठा फटाका बसला आहे. सुमारे पाऊण तास झालेल्या पावसाने सर्वाचीच तारां बळ उडाली.