नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी अर्थात् शुक्रवारी देशात लसीकरणाचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या एकाच दिवशी २.५० कोटीपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यासोबतच, चीनने यापूर्वी एकाच दिवशी केलेला २.२४ कोटी लोकांच्या लसीकरणाचा विक्रमही भारताने मोडित काढला आहे. एक कोटीपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा विक्रम आतापर्यंत चार वेळा करण्यात आल्यानंतर शुक्रवारी एका महाविक्रमाची नोंद करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, यांनी दिली
.सेकंदाला दिल्या ४६६ मात्रा भारतातील या सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेंतर्गत शुक्रवारी एका सेकंदाला ४६६ मात्रा देण्यात आल्या. याचा अर्थ एका मिनिटाला २८ हजार, तर तासाला १७ लाख मात्रा देण्याचा विक्रम करण्यात आला.देशात विश्वविक्रमी लसीकरण सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व लाभार्थ्यांशी आभासी संवाद साधला. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी काँग्रेसला चिमटाही काढला. मोदी यांनी डॉक्टरांना एक प्रश्न विचारला. अडीच कोटी लोकांना लस मिळाली, मग एका पक्षाला ताप का आला, असे मोदी म्हणाले