खोट्यापेक्षा अर्धसत्य अधिक : राहुल नार्वेकरांनी केला पलटवार

मुंबई:  सर्व सत्य माहिती असूनही, खोटं बोलून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. खोट्यापेक्षा अर्धसत्य समाजासाठी अधिक घातक असते, अशा शब्दांत विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरांनी पलटवार केला. आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले. यातून राहुल नार्वेकर, निवडणूक आयोग आणि राज्यपालांवर हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर नार्वेकर यांनी पत्रपरिषद घेऊन ठाकरेंवर पलटवार केला.

ते म्हणाले, आपण सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या चौकटीत राहून आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेच्या आधारे निर्णय घेतले. सुप्रीम कोटनि मला दिलेला आदेश पाहिला तर, त्यात मला असे सांगितले होते की, आधी मूळ राजकीय पक्ष कोणता, हे ठरवा. ते ठरवताना दोन गटांत घटनेच्या संविधानावरून वाद असतील तर, तुम्ही निवडणूक आयोगाकडे जी घटना आहे, त्याचा आधार घ्या. मी आयोगाला पत्र पाठवले आणि पक्षाची घटना मागवून घेतली, पण १९९९ चीच घटना आपल्याकडे असल्याचे आयोगाने कळविले.  शिवसेनेची घटना सुधारित आहे का, याबाबत विचारणा केली असता, १९९९ नंतरची कोणतीही घटना आमच्याकडे नसल्याचे आयोगाने म्हटले. उध्दव ठाकरे गटाकडून २०१३ आणि २०१८ ची घटना दुरुस्ती दिल्याचा दावा खोटा असल्याचे सांगताना, नार्वेकर यांनी २०१३ आणि २०१८ चे पत्र वाचून दाखवत ठाकरेंचे पितळ उघडे पाडले.