गगनयानचा अंतराळवीर जाणार अंतराळ स्थानकावर, इस्रो-नासा मध्ये करार

गगनयान मोहिमेसाठी सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या चार अंतराळवीरांपैकी एक जण नासासोबतच्या संयुक्त मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा प्रवास करेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी लोकसभेत दिली.

नासाने एक्झिओम स्पेस या खाजगी संस्थेची ओळख पटवली आहे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या संयुक्त मोहिमेसाठी इस्रोने अमेरिकन कंपनीसोबत अंतराळ उड्डाण करारावर स्वाक्षरी केली आहे, असे जितेंद्रसिंह यांनी लेखी उत्तर देताना सांगितले. भारतीय अंतराळवीरांना २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यासाठी भारत आणि अमेरिका सहकार्य करीत आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील वर्षी झालेल्या अमेरिका दौऱ्यात सांगितले होते.

भारताच्या अंतराळवीर निवड मंडळाने गगनयान मोहिमेसाठी भारतीय वायुदलाच्या चाचणी वैमानिकांच्या गटातून चार अंतराळवीरांची निवड केली होती. भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण पुढील वर्षी होणार आहे. चारही अंतराळवीरांनी रशियातील स्पेसफ्लाईट बेसिक मोड्युलवर प्रशिक्षण घेतले आहे. सध्या हे अंतराळवीर गगनयान मोहिमेसाठी बंगळुरूतील इस्रोच्या अंतराळवीर प्रशिक्षण सुविधा येथे प्रशिक्षण घेत आहेत, असे जितेंद्रसिह यांनी सांगितले.

गगनयात्री कार्यक्रमाचे तीनपैकी दोन सेमिस्टर पूर्ण झाले आहेत, तर स्वतंत्र सेमिस्टर सिम्युलेटर आणि स्टॅटिक मॉकअप सिम्युलेटर साकारले आहेत. प्रक्षेपण वाहन मानवी दृष्टीने सुरक्षित असावे, यासाठी प्रक्षेपण यंत्रणांच्या टप्प्यांची, त्यात घन, द्रव आणि क्रायोजेनिक इंजीनची जमिनीवरील चाचणी पूर्ण झाली असल्याची माहिती जितेंद्रसिंह यांनी दिली. आपत्कालीन परिस्थितीत अंराळवीरांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या यंत्रणेच्या सॉलिड मोटर्सची संरचना आणि ती साकरण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे जितेंद्रसिंह यांनी सांगितले.