पुरी: २० मे गांधी कुटुंबीयांच्या चार पिढ्यांनी राजकीय फायद्यासाठी वेळोवेळी राज्यघटनेत बदल करून भारतीय संविधानाचा अपमान केला. माझ्यासाठी राज्यघटना राज्यकारभाराचा सर्वांत मोठा ग्रंथ आहे. भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधानात कुठलाही बदल करणार नाही.
असे स्पष्ट करीत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.ओडिशातील पुरी येथे ‘रोड शो’नंतर जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या ४ सदस्यांनी त्यांच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राज्यघटनेचा वापर केला. गांधी घराणे राज्यघटनेशी खेळणारे पहिले कुटुंब असून, पंडित नेहरू यांनी पहिली घटनादुरुस्ती आणली.
त्यानंतर त्यांच्या मुलीने (इंदिरा गांधी) आपले पद वाचविण्यासाठी आणिबाणी लादली. इंदिरा गांधी यांनी राज्यघटना बदलून माध्यमांवर निर्बंध आणले. संपुआ सरकारच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या अध्यादेशाची प्रत राहुल यांनी माध्यमांसमोर फाडली होती. त्यांना राज्यघटना म्हणजे स्वतःच्या मालमत्तेच्या दस्तऐवजासारखी वाटत असल्याची टीका मोदी यांनी केली.
इंडिया आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या सन्माननीय सदस्यांबद्दल मला नितांत आदर आहे. राज्यघटनेमुळेच चहा विकणाऱ्याला पंतप्रधान होण्याची संधी दिली. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे. चार टप्प्यातील मतदानानंतर पराभवाची जाणीव झाल्याने इंडिया आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. निवडून येण्यासाठी जनतेला त्यांनी अनेक आमिषे दिली. मात्र, मतदार त्यांना बाहेरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मोदी यांनी दिला.