पाचोरा : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जळगाव जिल्ह्यात रहिवास असणाऱ्या, मात्र जिल्हा हद्दीबाहेर शेजारील जिल्ह्यात शेती असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येऊ नये, अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. यानिर्णयाविरोधात भाजपाचे अमोल शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे कैफियत मांडत हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मंत्री महाजन यांनी हा निर्णय तात्काळ मागे घेतला असल्याची माहिती अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जळगाव जिल्ह्यात रहिवास असणाऱ्या, मात्र जिल्हा हद्दीबाहेर शेजारील जिल्ह्यात शेती असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येऊ नये, अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. परिणामी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव हरेश्वर, वरसाडे तांडा, सातगाव डोंगरी,वडगाव कडे,अटलगव्हाण,शिंदाड,सार्वे, पिंप्री,खडकदेवळा,चिंचखेडा बु. डोंगरगाव,नगरदेवळा,सिम निपाने,बदरखे,दिघी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सदर पीककर्ज मिळणार नव्हते ही बाब अमोल शिंदे यांनी लक्षात आणून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. मंत्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून हा निर्णय मागे घेण्याचे सांगितले. त्यामुळे भडगाव-पाचोरा तालुक्यातीलच नव्हे या निर्णयाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती अमोल शिंदे यांनी दिली.
आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका
जिल्हा बँकेचे मागील पाच वर्षांपासून व्हाईस चेअरमन व आता संचालक असलेले लोकप्रतिनिधी यांना शेतकऱ्यांचा थोडा देखील कळवळा वाटला नाही का ? अशी टीका अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर नाव न घेता केली. भडगाव तालुक्यात वादळी वारा, पाऊस झाला होता. हजारो शेतकऱ्यांचे केळी, फळबागांचे नुकसान झाले होते या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांना त्याचे पैसे मिळलेले नाही. मागील वर्षी पावसाचा २१ दिवसांचा खंड पडला त्याचे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. याकरिता त्यांच्याकडून कुठलाच प्रयत्न झाला नाही. भडगाव-पाचोरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावे याकरिता मी व भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भांडला याचे त्यांना काहीच वाटले नाही. काल परवा सुद्धा पाचोरा भडगाव तालुक्यात वादळी वारा, पाऊस झाला यात फळबागांचे नुकसान झालं. आम्ही विजयी जल्लोष सोडून बांधावर पोहचलो, शेतकऱ्यांच्या वेदना, अडचणी जाणून घेतल्या. तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले. पंचनामा करण्याच्या सूचना करत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्वतः लोकप्रतिनिधी असतांना आपल्या नावासमोर वेगवेगळी आभूषणे लावून घ्यायची, आपण किती मोठे आहोत, ग्रेट आहोत हे सांगण्यासाठी वेळ वाया घालविण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करावे. त्यांचे काम शून्य आहे. विजयाचा जल्लोष करतांना त्यांनी कार्यकर्त्यांना शेवटचे १०० दिवस राहिले आहेत कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत. मी शंभर टक्के सांगू इच्छितो की, त्यांचे शेवटचे १००-१२० दिवस शिल्लक राहिले आहेत.शेतकरी त्यांना घरी पाठविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला.