तळोदा : दवाखान्याच्या कामानिमित्त नंदुरबार येथे जाणाऱ्या दाम्पत्यांच्या दुचाकीला भरधाव गुजरात राज्य परिवहन बसने धडक दिली. यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, मृत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना तळोदा येथे आज, शुक्रवारी घडली. अवंतीका अभिजित कलाल (38) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तळोदा येथील शनी गल्लीत राहणारे दांम्पत्य अभिजित किसनसा कलाल (४५), अवंतीका अभिजित कलाल (38) हे आज त्यांच्या मोटर सायकलने नंदुरबार येथे दवाखान्याच्या कामासाठी जात होते. दरम्यान, त्यांच्या मिशन स्कुलमध्ये शिकणाऱ्या मुलीला भेटून बायपास मार्गे चिनोदा चौफुलीकडे जात असताना बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील बालाजी पेट्रोल पंपासमोर त्यांच्या मोटरसायकलला मागून येणाऱ्या गुजरात राज्य परिवहन अंकलेश्वर डेपोच्या बस क्र. जी.जे. 18 झेड 8409 ने ओव्हरटेक करण्याचा नादात मागून धडक दिली.
या अपघातात मोटरसायकल वरील अवंतिका कलाल ह्या मोटर सायकल वरून दूर फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. मात्र अपघात स्थळावरून नागरिकांनी त्यांना तात्काळ नंदुरबार येथील दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला. तर अभिजित कलाल यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. याबाबत नंदुरबार शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास तळोदा पो.स्टे. चे पो नि राहुल पवार पो उ नि सागर गाडीलोहार करीत आहेत.