गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन,घनकचरा व्यवस्थापनाचे अद्ययावत प्रणालीदृारे सनियंत्रण करावे

मुंबई/जळगाव : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाची कामे मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरू आहेत. राज्यात सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची योग्य पध्दतीने अंमलबजावणी व्हावी, याबाबतची परिपूर्ण माहिती ग्रामपंचायत तसेच राज्यस्तरावर तत्काळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कुटुंब व सार्वजनिक स्तरावरील कचरा संकलित करून त्याचे प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहचविण्याच्या प्रक्रियेचे अद्यावत प्रणालीद्वारे सनियंत्रण व मूल्यमापन करण्याबाबत स्वतंत्र कार्यपध्दती विकसित करावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील  यांनी दिल्या.

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अतंर्गत विविध विषयाच्या अनुषंगाने पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरील आढावा बैठक  सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय कुटे, मुख्यमंत्री शिंदे यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगरानी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, राज्य पाणी व स्वच्छता मिशन अभियान संचालक तथा सहसचिव, शेखर रौंदळ,   कार्यकारी अभियंता अपूर्वा पाटील, अवर सचिव चंद्रकांत मोरे, अवर सचिव स्मिता राणे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, स्वच्छतेच्या बाबत ग्रामीण भागातील नागरिकांचे वर्तणूक बदल घडविणे आवश्यक आहे.  त्याचबरोबर कुटुंब स्तरावरील व सार्वजनिक ठिकाणावरील कचऱ्याचे संकलित करुन प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहचविण्याच्या प्रक्रियेचे अद्यावत प्रणालीद्वारे स्वतंत्र कार्यपध्दती विकसित करुन सनियंत्रण करणे आवश्यक आहे. जेणेकरुन ग्रामीण भागातील कचऱ्याचे 100 टक्के व्यवस्थापन करण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास मंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिले.