गुलाबी थंडीची चाहूल ; जळगावात आठ दिवसात किमान तापमान ‘एवढ्यांनी’ घसरले

जळगाव : जळगावसह राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात हळूहळू ‘ऑक्टोबर हीट मावळतीकडे तर पहाटेचा गारवा उगवतीकडे’ जात असल्याचं चित्र दिसत असून गत आठ दिवसात जळगावमधील किमान तापमानात मोठी घसरण झाल्याने पहाटच्या थंडीचा कडाका वाढला आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. पितुपक्षात जिल्ह्याचे तापमान ३७ सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने जळगावकर चांगलेच त्रस्त झाले होते. मात्र आता गत आठ दिवसांपासून तापमानात घसरण होत असून, थंडी वाढत आहे.

गत आठ दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात किमान तापमानात तब्बल १६ ते १७ अंशांनी घसरण झाली आहे. गेल्या रविवारी जळगावातील किमान तापमान २८ पर्यंत होते. त्यात घसरण होऊन आता ११.४ अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.पहाटे थंडी, तर दुपारी सुसह्य ऊन अशा आल्हाददायक वातावरणामुळे जळगावकर सुखावले आहेत.