तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । घरगुती सिलेंडरच्या टाक्यांमधील गॅस वाहनांमध्ये भरून दिला जात असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडीस आले आहेत. असाच एक प्रकार धुळे शहरात समोर आला असून येथील पोलिसांनी छापा टाकून कारखाना उध्वस्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पारोळा रोड या परिसरामध्ये गजबजलेल्या ठिकाणी एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून वाहनांमध्ये इंधन म्हणून भरण्याचा धंदा सर्रासपणे करत होता. याबाबत उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळाली. त्यानुसार एक पथक संबंधित ठिकाणी छापा टाकण्यासाठी पाठवण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित ठिकाणी गॅस सिलेंडरच्या टाकींसह गॅस भरण्यासाठी आलेली वाहने त्याचबरोबर गॅस सिलेंडरमधून वाहनात गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण दोन लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईदरम्यान एका ईसमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून पुढील कारवाई आझाद नगर पोलीस करीत आहेत.