पाचोरा : गेल्या काही महिन्यांपूर्वी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणातील पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा मदतनिधी पिडितेच्या कुटुंबाच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली होती मदतीची ग्वाही
या घटनेची तत्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. तसेच पाचोरा येथे 12 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबास शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल, अशी घोषणा केली होती. यानंतर 35 दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांनी या घोषणेची प्रतिपूर्ती केली आहे.महाराष्ट्र शासनाकडून पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांचा मदत निधी वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने लवकरच मदतनिधी धनादेश गोंडगाव येथे जाऊन दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे .
आमदार किशोर पाटलांची मागणी
गोंडगावच्या या संतापजनक घटनेनंतर पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. दरम्यान, पाचोरा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पीडितेच्या कुटुंबास 5 लाख रूपये मदत दिली जाईल, अशी घोषणा केली होती.
काय आहे नेमकं प्रकरण
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. तसेच त्यानंतर तिचा मृतदेह हा गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना 30 जुलै 2023 रोजी घडली होती. यात संशयित आरोपी म्हणून स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-19) याला अटक करण्यात आली आहे.