Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीत जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे.चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या लोकसभेचे हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील, अशी घोषणा केल्यापासून महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.
काल नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शेकडो समर्थकांसह ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर नाशिकमधील जगाचा तिढा आणखीनच बिकट होत असल्याचे दिसून येत आहे. हेमंत गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर आता नाशिकमधील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. नाशिकच्या जागेसंदर्भात नाशिक भाजपचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. शहरातील सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत. आज सायंकाळी सागर बंगल्यावर भाजप पदाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.