गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल; जळगावात पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

जळगाव : मांसासाठी गोवंश जातीच्या जनावरांचा कत्तलीसाठी वापर होत असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळताच, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करुन दोघा संशयितांना अटक केली. शहरातील हुडको कॉलनी व नागदरोड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील सहायक पोलिस निरीक्षक सागर ढिकले हे कर्मचारी नितीश पाटील, भूषण पाटील, विजय पाटील, पवन पाटील, राकेश पाटील, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, पवन पाटील, आशुतोष सोनवणे यांच्यासोबत गस्तीवर असताना शहरातील मदिना मस्जीद जवळ, डॉ. झाकीर हुसेन सोसायटी परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करुन मांस विक्री होत असल्याची माहिती हवालदार आशुतोष सोनवणे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिस कर्मचारी संदीप पाटील व वरील सर्व कर्मचाऱ्यांना कळवून नवागाव ते चौधरीवाडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या सलीम खान ईस्माईल खान कुरेशी याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये अचानक छापा टाकला असता, दोन जण गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करुन कुऱ्हाड व सुऱ्याने मांस कापत असताना मिळून आले.

रिजवान खान सलीम खान कुरेशी (वय २३) व इरफान खान सलीम खान (वय २३, दोन्ही रा. मदिना मस्जीद जवळ, डॉ. झाकीर हुसेन सोसायटी, चाळीसगाव) अशी त्यांची नावे असून त्यांच्या कडून आठ हजार रुपये किमतीचे ८० किलो गोवंश जातीच्या जनावराचे मांस, दोन हजार रुपयांचा ताण काटा, पाचशे रुपये किमतीची कुऱ्हाड व सुरी असा एकूण १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीही कारवाई  करण्यात आली.