गोव्यात १२ व्या वैश्विक हिंदू राष्ट्र मोहत्सवाचे आयोजन ; जळगाव जिल्ह्यातील २२ प्रतिनिधी होणार सहभागी

जळगाव :   हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून  या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे होणार असून या वर्षी जळगाव जिल्ह्यातून २२ प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत, असे हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जळगाव विभाग प्रमुख आकाश फडे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता निरंजन चौधरी हेही उपस्थित होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांचे परिसंवाद, तसेच प्रत्यक्ष समान कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी गटचर्चा असतील.विविध विषयांसोबतच हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विविध विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे.

संपूर्ण देशभरातून विशेष करून २९-३० जुन या काळात अधिवक्ता येणार आहेत. आपल्या कान्हादेश भागातूनही या वर्षी जवळपास ८ अधिवक्ता या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यात तालुका पातळीपासून ते अगदी सर्वाेच्च न्यायालयापर्यंत सर्व स्तरावरून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत अधिवक्ता एकत्र येणार आहेत, असे हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता निरंजन चौधरी यांनी सांगितले.

प्रशांत जुवेकर म्हणाले की, या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, नेपाळ, घाना आणि बांग्लादेश या देशांतून प्रतिनिधी येणार आहेत. या देशांसह भारतातील २६ राज्यांतील १००० हून अधिक हिंदु संघटनांच्या २००० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय प्रामुख्याने श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी, तसेच काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक कपिल मिश्रा, भारताचे माजी माहिती आयुक्त तथा ‘सेव कल्चर सेव भारत’चे संस्थापक उदय माहूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र – गोवा बार काऊन्सिलचे माजी अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुख, सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिराचे सचिव प्रा. नीळकंठ चौधरी, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल वानखेडे, चोपडा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता धर्मेंद्र सोनार, जसलीन आस्थापनाचे मालक व्यावसायिक उमेश सोनार हेही या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.