ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांना 302 कोटींचे कर्ज वितरित

महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गट हे महत्त्वाचे साधन असून या स्वतंत्र व्यासपीठाच्या माध्यमातून जिल्ह्यात मागिल तीन वर्षात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत  महिला बचत गटांना जवळपास 302 कोटीवरचे कर्ज वितरित करण्यात आले असून त्यांनी शंभर टक्के कर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे अधिकाधिक बचत गटांनी विविध उत्पादनासाठी कर्ज घेण्यासाठी पुढे यावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात यावे अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीअंकित यांनी 17 रोजीसाने गुरुजी सभागृहात आयोजित बचत गटांच्या आढावा बैठकीत दिल्या. या बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डी.आर. लोखंडे, उमेद अभियान व्यवस्थापक हरेश भोई उपस्थित होते.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतंर्गत उमेद अभियानाच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात येतो. त्यातून लहान-मोठ्या उद्योगाची उभारणी करुन ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिल्या जातो. त्याचबरोबर गरजा भागविण्यासाठी बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यात येतो.  जिल्ह्यात 28 हजारांवर नोंदणीकृत बचत गटांची संख्या आहे. 2020-21 मध्ये जिल्ह्यातील 4374 महिला स्वयंसहायता समूहांनी 59कोटी 94लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. वर्ष 2021-22 मध्ये 6576 गटांनी 82कोटी 6 लाखांचे तर वर्ष  2022-23 मध्ये 8151 बचत गटांनी 160कोटी 8 लाखांचे कर्ज घेतले होते. बचत गटांनी या तिन्ही वर्षांमध्ये तसेच आतापर्यंत घेतलेल्या एकूण 302 कोटी 9 लाखांवरील कर्जाच्या रकमेपैकी 99 टक्क्यांवर कर्जाची परतफेड केल्याची माहिती जि.प.सीईओंनी आढावा बैठकीत  दिली. बचत गटांच्या माध्यमातून महिला उद्योजिका झाल्या आहेत. त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले. यातून ग्रामीण भागातील महिलांनाही रोजगार मिळाला. या बैठकीस उमेद अभियानातील सर्व तालुका व्यवस्थापक , प्रभाग समन्वयक उपस्थित होते.