साक्री : रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने उपचाराअभावी एका अपघातग्रस्त तरुणाला जीव गमवावा लागला. साक्री ग्रामीण रुग्णालयात शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. ग्रामीण भागातील आरोग्य स्थिती किती भयानक आणि गंभीर आहे, हे सांगणारी ही धक्कादायक घटना आहे. मुस्कीम शकील तांबोळी (३०) रा. निजामपूर असे आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेचा बळी ठरलेल्या तरूणाचे नाव आहे. रुग्णवाहिका वेळेत का उपलब्ध होवू शकली नाही, याबाबत चौकशीची मागणी जोर धरून आहे.
नांदेड, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणांच्या शासकीय रुग्णालयांतील मृत्यू प्रकरणांचा धूरळा बसत नाही तोवरच ही घटना घडली आहे. दुचाकीला पिकअपने धडक दिली यातून हा अपघात झाला. जखमी तांबोळी याला तात्काळ उपचारार्थ साक्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी प्रथमोचार केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ धुळे येथे नेणे आवश्यक होते. स्वतः डॉ. चित्तम यांनी रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केले. मात्र वेळेत उपलब्धता न झाल्याने तांबोळी याला जीव गमवावा लागला. साक्रीकरांनी उपजिल्हा रुग्णालयाला गती देण्यासह अद्ययावत रुग्णवाहिकेची मागणी केली आहे.
शनिवारी दुपारी साक्री शहराच्या पूर्वेकडील एक किलोमीटर अंतरावरील हॉटेल उदय पॅलेस जवळ ही घटना घडली. निजामपूर येथील फळविक्रेता मुस्कीम शकील तांबोळी हा साक्री शहराकडे दुचाकीने एमएच १८ बीबी २९१७ येत असताना समोरून येणाऱ्या एचपी गॅस कंपनीच्या पिकअपने एमएच१८ बीजी ६८५५ धडक दिली. यात मुस्कीम गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारार्थ साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी प्रथमोपचार केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने धुळे येथे पुढील उपचारार्थ हलविण्यासाठी डॉ.चित्तम यांनी रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केले. मात्र वेळेवर ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला.
केवळ ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका साक्री ग्रामीण रुग्णालयाला उपलब्ध न झाल्यामुळे तरुणाच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल रुग्णाच्या नातेवाईकांसह शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. रुग्णवाहिका वेळेत का उपलब्ध होवू शकली नाही, याबाबत चौकशीचीही मागणी केली. शासनाने साक्री ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधांयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी आणि भविष्यातील घटना टाळाव्यात अशी मागणी शिवसेनेचे पंकज मराठे, बाळा खैरनार, किशोर वाघ यांच्यासह कार्यकर्त्यांनी व निजामपूर येथील मयताच्या नातेवाईकांनी डॉ. हर्षवर्धन चित्तम यांच्याकडे केली. रुग्णालयातीलवातावरण अतिशय गंभीर झाले होते. पोलिस निरीक्षक मोतीराम निकम व सहकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने निवळले.