नंदुरबार : घराच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना नवापूरात दुपारी साडेबारा वाजता घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूरातील लाईट बाजार परिसरातील राजूभाई नागरमल अग्रवाल यांच्या निवासस्थानी आग लागली. आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या व्यापारी व नागरिक मदतीला धावून आले. व्यापाऱ्यांनी तात्काळ नवापूर पोलीस व नगरपालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण केले अन् आग विझवण्यात आली. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून किरकोळ नुकसान झाले आहे.
घराला लागलेल्या आगीचे कारण अजून समजू शकलेले नाही. अर्धा पाऊण तासानंतर आग नियंत्रणात आली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. भर बाजारात आग लागल्याने मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी काही काळ वाहतुकीचे कोंडी निर्माण झाली. आगीत किती नुकसान झाले अजून तरी स्पष्ट झाले नाही. परंतु तिसऱ्या मजल्यावरील घर सामान जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महसूल विभागाने आगीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अग्रवाल कुटुंबांनी केली आहे.