घर-वाहन खरेदी कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा, कर्जावर प्रक्रिया शुल्क नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने गुरुवारी सादर केलेल्या द्विमासिक पतधोरणात नवीन घरासाठी तसेच वाहनासाठी कर्ज घेणाऱ्यांना दिलासा दिला आहे. या कर्जदारांना आता प्रक्रिया शुल्क देण्याची गरज राहणार नाही, अशी माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रपरिषदेत दिली.या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग सहाव्यांदा कोणताही बदल केलेला नाही.

हा दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाचा ईएमआय स्वस्त झालेला नाही. परंतु, जे आता नवीन कर्ज त्यांना कागदपत्रे, प्रक्रिया शुल्क आणि इतर प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. हे त्यांच्या कर्जावरील व्याजात जोडले जाईल. ग्राहक कर्ज घेण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना सुरुवातीला कागदपत्रे, प्रक्रिया आणि इतर शुल्क भरावे लागते. त्यामुळे त्यांच्या कर्जावर होणारा खर्च अधिक वाढतो. रिझर्व्ह बँकेने त्यांच्या व्याजदरात कर्जावरील इतर शुल्क समाविष्ट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना किती व्याज द्यावे लागेल, याची माहिती मिळेल, असे दास यांनी सांगितले.