घशात खवखव आणि सततचा खोकला; जळगावकर धुळीने बेजार!

जळगाव : शहरात काही दिवसांपासून धुळीचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वेळी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात प्रदूषण वाढल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत रस्त्यावरील खड्डे, पावसाची पाणी वाहून गेल्यानंतर रस्त्यावर आलेली माती, यामुळे जळगाव शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील दवाखाने फुल्ल होत असून नागरिकांना श्वसनाचे आजार जडल्याचे निदर्शनास येत आहे.

रस्त्यावर काही काळ थांबल्यास संपूर्ण धूळ अंगावर थराप्रमाणे साचत असून याच दरम्यान श्वसनातून शरीरात धूळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांचे आजारी होण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत जल प्रदूषण देखील होत असल्याच निदर्शनास आले आहे. यामध्ये प्रामुख्याने एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपन्यामधून निघणारे रसायनयुक्त पाणी थेट गटार आणि नाल्याच्या माध्यमातून मोठ्या नद्यांना आणि तलावात जाऊन मिळत आहे. याचा परिणाम नद्या आणि तलावातील जैवविविधतेवर होत आहे.

त्यामुळे नदीसह तलाव परिसरातील जैव विविधता नष्ट होत असल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. याचबरोबर नदी तलाव परिसरात असंख्य पशुपक्षी अधिवास करत असतात. या पशुपक्ष्यांच्या अधिवासावर देखील त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.