---Advertisement---
घोषणापत्र आन्हिकाला भाजपाचा फाटा निवडणूक म्हटली म्हणजे ती विधानसभेची असो की, लोकसभेची प्रत्येक राजकीय पक्षाने आपापले घोषणापत्र प्रसिध्द करणे हे अलिकडच्या काळात एक आन्हिक बनले आहे त्यानुसार रा राजकीय पक्ष आपण सत्तेत आलो तर कोणता कार्यक्रम घेणार आहोत याची ठराविक साचातील मांडणी या घोषणापत्रातून करीत असतात. पूर्वी या प्रकाराला निवडणूक जाहीरनामा म्हणत असत. आता त्याला कुणी घोषणापत्र म्हणतात तर कुणी संकल्पपत्र म्हणतात, आपले वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी कुणी वचननामाही म्हणतात. नाव कोणतेही असो पण तसे घोषित करणे ही आता एक औपचारिकता बनली आहे. ती औपचारिकता किंवा आन्हिक बनली म्हणजे तिचे महत्व अर्थातच त्या प्रसिध्दीपत्रकापुरतेच मर्यादित राहते. रविवारी सकाळी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात त्या पक्षाने घोषित केलेले संकल्पपत्र मात्र या औपचारिकतेला अपवाद होते असे म्हणावे लागेल.
याप्रसंगी असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जगतप्रसाद नवा वा अन्य मंत्री यांची उपस्थिती हा तो अपवाद म्हणता येणार नाही. भाजपा आपले संकल्पपत्र किती गांभीयनि घेते हा या समारंभाचा अपवाद होता असे म्हणावे लागेल. ब्राह्मणाने जशी तिन्ही त्रिकाळ संध्या केली पाहिजे असे म्हणतात त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर घोषणापत्र प्रसिध्द केलेच पाहिजे, असे या औपचारिकतेचे स्वरूप आहे. म्हणूनच त्यासाठी आन्हिक हा शब्द वापरावा लागतो. ते आन्हिक पार पाडणारी ब्राह्मण किती हा प्रश्नच असला तरी राजकीय पक्ष मात्र ही प्रथा आन्हिकासारखीच पार पाडतात. कालच कॉंग्रेस पक्षाचे घोषणापत्र एका पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आले. पण त्याचे स्वरूप मात्र आन्हिकापेक्षा फार वेगळे नव्हते. भास्तीय जनता पार्टी मात्र पूर्वीच्या जनसंघ काळात वा आता भाजपाच्या काळात घोषणापत्राचे गांभीर्य कायम राखण्याचा प्रयत्न करते, हे रविवार सकाळच्या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. काँग्रेस पक्ष निदान निवडणूक जाहीरनामा पत्रकार परिषदेतून जाहीर तरी करते पण इतर पक्ष असा जाहीरनामा केव्हा तयार करतात. केव्हा आणि कसा प्रसिध्द करतात हे मतदाराना कळतही नाही. भाजपाचे वेगळेपण असे की, तो पक्ष निवडणूक घोषणापत्राचा हा विषय अतिशय गांभीर्याने घेते. पक्षात हे घोषणापत्र तयार करण्यासाठी निवडणुकीच्या आधी एक समिती नियुक्त करते. ही समिती नागरिकांकडून (फक्त भाजपा कार्यकत्र्यांकडूनच नव्हे) सूचना मागविते. समितीच्या बैठकीत त्या सूचनांवर विचार केला जातो.
शिवाय समितीच्या सदस्यांशी चर्चाही केली जाते. त्यातून बाहेर पडणारे नवनीत म्हणजे संकत्पपत्र, ते आजच्यासारख्या कार्यक्रमातून जाहीर केले जाते.या वर्षीही भाजपाने हीच पध्दती अवलंबिली. संकल्पपत्र तयार करण्यासाठी ज्येष्ठतम मंत्री व पक्षाचे पूर्वाध्यक्ष राजनाथसिंग यांच्याअध्यक्षतेखाली ही समिती तयार करण्यात आली. त्या समितीने मागविलेल्या सूचनांची संख्या काही लाखात आली. त्यांचा साधकबाधक विचार करून व भाजपाच्या गेल्या दहा वर्षातील वाटचालीचा विचार करून हे संकल्पा तयार करण्यात आले आणि पक्षाध्यक्ष, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, इतर मंत्री, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी व दिल्लीतील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत स्वतः पंतप्रधानानी ते सादर केले. यावरून हा विषय भाजपा किती गांभीर्याने घेते हे स्वाभाविकपणे अधोरेखित होऊन गेले, पंतप्रधान या संकल्पपत्रातील एकेका मुद्याचा उल्लेख करून, त्याला गेत्या दहा वर्षातील अनुभवांची जोड देऊन आणि पुढील पाच दहा वर्षांचा वेध घेऊन एकेक मुद्दा स्पष्ट करीत होते तेव्हा त्यातूनही या विषयाचे गांभीर्य अधोरेखित होत होते. औपचारिकता कुठल्याकुठे पळून जात होती.
ल.त्र्यं. जोशी,
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर
९६९९२४०६४८