चंदन चोरांवर झडप ; नऊ जण फरार दोघे अटकेत

जळगाव : चाळीसगाव तालुका वनपरिक्षेत्रात पाटणादेवी जंगलात दोन दिवसापूर्वीच वनविभागाच्या पथकाने चंदन चोरांच्या टोळीवर पाळत ठेवून झडप घातली. यात अकरा जणांपैकी दोन जण वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले तर नऊ जण अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

चाळीसगाव वनपरिक्षेत्रांतर्गत पाटणादेवीच्या जंगलात चंदनाची झाडे तोडली जात असल्याची माहिती वन विभाग कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार या चोरट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून चंदनाची चोरी करणाऱ्या अकरा जणांच्या टोळीवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झडप घातली. यात ९ जण अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेले. पिंटू वाल्मीक गिरे व शिवराम आबा मेंगाळ, दोन्ही रा. गुजरदरी, ता. चाळीसगाव असे दोन चोरटे वनकर्मचाऱ्यांच्या हाती गवसले. त्यांच्याकडून २ कुऱ्हाडी, २ लहान करवती, काळया रंगाची पिशवी त्यात स्वयंपाकाचे मसाले व इतर साहित्य तसेच ओल्या सालीसकट १३ किलो चंदनाचे लाकूड व तीन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहे.

दोघांना वन कोठडी

पिंटू वाल्मीक गिरे व शिवराम आबा मेंगाळ दोन्ही रा. गुजरदरी, ता. चाळीसगाव या चंदनचोरांना येथील न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, यातील फरार चोरट्यांचा शोध घेत असताना नांदगाव तालुक्यातील लोढरे ठाकरवाडी येथे संशयित मच्छिंद्र विठ्ठल पोकळे, भाऊराव लक्ष्मण मेंगाळ, सुखदेव गणपत आव्हाळे लपून बसल्याची माहिती मिळाली. तेथे वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता तेथूनही चारही संशयीत फरार झाले होते. संशयित सुखदेव आव्हाळे याच्या घरी तपासणी दरम्यान धारदार कुऱ्हाडी, सुरा, कोयता, पहार तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे नॉयलॉनचे जाळे आढळून आले.

गुजरदरीत दोघांना पकडले
तपासादरम्यान काही संशयित चाळीसगाव तालुक्यातच गुजरदरी येथे असल्याची माहिती मिळाली. यातील संशयित धनराज आबा मेंगाळ, शिवराम पिंटू गिरे, भाऊराव मच्छिंद्र मेंगाळ, लखन कडूबा मेंगाळ हे देखील वनकर्मचारी येण्यापूर्वीच तेथून फरार झाले. दरम्यान, दोघा संशयितांना पुन्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. रहाटकळ, वनपाल गादेचव्हाण, डी. के. जाधव, वनरक्षक आर. जी. तडवी, पी. सी. कुलकर्णी वनरक्षक, ए. बी. मोरे, उम `श सोनवणे, वनमजूर रमेश राठोड, राजाराम चव्हाण, गोरख राठोड, संदीप पवार, सचिन जाधव, बापू आगोणे यांच्या पथकाने केली.