नुकतीच नववर्षाच्या स्वागताकरिता सहाव्या वर्गातील मुलांनी बिअरची पार्टी केल्याची बातमी वाचण्यात आली. तरुणांमधील व्यसनाधीनता हा जरी चर्चेचा मुद्दा असला, तरी इतक्या लहान वयातील मुलांनी अशा पद्धतीची पार्टी केल्याची बातमी ही फारच धक्कादायक म्हणावी लागेल. ज्यांचे वय हे नवनवीन विद्या आत्मसात करण्याचे आहे, ज्यांचे वय हे नवनवीन क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त करण्याचे आहे त्या अगदीच कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचे वर्तन करणे, ही बाब फारच गंभीर म्हणावी लागेल. आज गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकच मुलाचे आई-वडील त्याला उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, उत्तम सुखसोयी मिळाल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करताना दिसतात. याच मुलांच्या भरवशावर त्यांनी भविष्यातील काही स्वप्न पाहिलेले असतील. परंतु, जर ही मुले अशा पद्धतीने इतक्या कोवळ्या वयातच व्यसनाधीनतेकडे ओढली जाणार असतील किंवा चंगळवाद हा जर त्यांचा कल असेल तर आई-वडिलांच्या स्वप्नांना सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही. हुक्का पार्टी, रेव्ह पार्टी अशा वेगवेगळ्या पार्ट्या तरुणांमध्ये प्रचलित आहे. त्याबद्दलच्या बातम्या आपल्या वाचनात येत असतात. परंतु, जे तरुणांमध्ये पोहोचलेले आहे ते आता बालकांमध्ये झिरपायला लागलेले आहे.
कुणाचे काय चुकत आहे याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. कारण, मुलांना सर्व आवश्यक त्या सुखसोयी प्रदान करण्याकडे पालकांचा कल आहे. परंतु, सर्व प्रकारांच्या सुखसोयी प्रदान करून व्यक्तीचे जीवन घडविता येते का, हाही प्रश्न विचार करण्यासारखा आहे. फक्त सुखसोयी प्रदान करून जर लोक मोठे झाले असते तर यापूर्वीच्या काळामध्ये अनेकानेक ठिकाणी अभावांमध्ये चांगले कर्तबगार लोक कसे निर्माण झाले असते. ज्यांनी आपल्या विद्यार्थिदशेमध्ये माधुकरी मागून आपले विद्याध्ययन पूर्ण केले असेही विद्यार्थी खूप मोठ्या पदावर गेलेले आपल्याला माहिती आहे. आता तर माधुकरी हा काय प्रकार आहे हे नवीन विद्यार्थ्यांना सांगण्याचीच आवश्यकता आहे. कारण, असा काही प्रकार प्रचलित होता, अशा पद्धतीने काही विद्यार्थी शिक्षण घेत होते हे त्यांना आश्चर्यकारक वाटू शकते. अनेक विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आलेल्या सर्व अडीअडचणींना, संकटांना आणि सुखसोयींच्या अभावाला Swami Vivekananda जीवनामध्ये एक आव्हान म्हणून स्वीकारले. त्यांना हे माहिती होते की, आजचे हे अडचणीचे दिवस कधीतरी संपतील आणि यातून भविष्याची सोनेरी पहाट उगवेल. परंतु, आता विद्यार्थ्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध असतानाही त्यांचा कल व्यसनाधीनता आणि चंगळवादी गोष्टींकडे का जावा, हाच एक मोठा यक्ष प्रश्न आहे.
अनेकदा असेही वाटते की, मागितलेली प्रत्येक गोष्ट मागितलेल्या वेळेस मिळाल्याने सुखसोयी हा माझा अधिकार आहे, मला त्या मिळाल्याच पाहिजे. पालकांनी त्या दिल्या तर त्यात काय विशेष अशा पद्धतीचा भाव निर्माण होऊ शकतो. प्रत्येक वेळेस हवे ते दिल्याने अहंकाराचे पोषण होत असते. यातूनच पुढे नाही ऐकून न घेण्याची मानसिकता तयार होते. जीवन तर चढ-उतारांनी भरलेले आहे. अशा परिस्थितीत नाही ऐकण्याची सवय असणे गरजेचेच आहे. एखादी गोष्ट मला पाहिजे होती, पण ती मिळू शकली नाही, हे पचविणे गरजेचे आहे. जीवनामध्ये विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी मनासारख्या मिळणार नाहीत. मनासारखी नोकरी मिळणार नाही, मनासारखे गुण मिळणार नाही, मनासारखा जीवनसाथी मिळणार नाही. अशा अनेक गोष्टी मनासारख्या होणार नाहीत, परंतु त्या सर्व पचविण्याची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. मुलांसाठी खूप मोठा पैसा जमा करून ठेवण्यापेक्षा त्यांना गरजेइतका पैसा कसा मिळविला पाहिजे यासाठी लायक बनविणे आवश्यक आहे. मुलांसमोर चांगले आदर्श ठेवले गेले पाहिजे. चांगल्या कथा त्यांना माहीत झाल्या पाहिजे. इतरांसाठी जगण्यामध्ये खरा आनंद आहे, हे पण त्यांना सांगितले गेले पाहिजे. येत्या काही दिवसात स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की, तुम्ही भारताला ओळखा. भारताला जर ओळखायचे असेल तर आमचा देश, धर्म, संस्कृती, इतिहास या सर्वांचे ज्ञान विद्यार्थ्यांना करून देणे आवश्यक आहे. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेमध्ये आपले भाषण करताना सुरुवातीच्या पहिल्या वाक्यात स्वामीजी म्हणतात, लाखो वर्षे जुन्या संन्यासी परंपरेचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. त्यांनी स्वतःचा संबंध लाखो वर्षे जुन्या संन्यासी परंपरेशी जोडला आहे. आमच्याही विद्यार्थ्यांना आमच्या श्रेष्ठ पूर्वजांबद्दल माहिती असायला हवी. स्वामी विवेकानंद म्हणायचे की, मला देशाचे चित्र बदलविण्यासाठी 100 तरुण हवे आहेत. अर्थातच हे शंभर तरुण ध्येय समर्पित, सर्वस्व समर्पित, राष्ट्र समर्पित अशा पद्धतीचे त्यांना हवे होते. म्हणून ते म्हणायचे की, येणार्या 50 वर्षांसाठी तरी भारत माता ही आपली आराध्य देवता असायला पाहिजे. त्यांचा हा संदेश म्हणजे नेशन फर्स्ट- राष्ट्र सर्वप्रथम असाच आहे.
विदेशी लोकांचे सण, उत्सव, त्यांचा पोशाख त्यांच्या चालीरीती, एवढेच काय त्यांची जीवन पद्धती आत्मसात करण्याकडे अनेक तरुण मुला-मुलींचा कल आपल्याला दिसून येतो. परंतु स्वामी विवेकानंद म्हणतात, राजासारखा पोशाख घातल्याने तुम्ही राजा होणार आहात का? वाघाचे कातडे पांघरल्याने तुम्ही वाघ बनणार आहात का? प्रत्येक राष्ट्र वेगवेगळ्या गोष्टीतून आपला जीवनरस शोषून घेत असते. भारताने आपला जीवनरस धर्मामधून शोषून घेतलेला आहे. आमच्या मुला-मुलींना आम्ही आमचे भारतीय असणे ही किती अभिमानाची गोष्ट आहे, हे सांगितले पाहिजे. त्यातूनच त्यांचे विदेशी लोकांची नक्कल करणे थांबेल किंवा कमी होईल. आमच्या धर्माबद्दलची माहिती आम्ही त्यांना दिली पाहिजे.
आमचे थोर पुरुष, आमचे क्रांतिकारक हे जर तरुणांचे हिरो असतील तर त्यांनाही तसेच बनावेसे वाटेल. तसेच कार्य करावेसे वाटेल. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकावेसे वाटेल. मुलांना चांगल्या सुखसोयी द्यायला हरकत नाही, परंतु त्यांना चांगले आदर्शही देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या तरुण अवस्थेपर्यंत त्यांना एखाद्या चांगल्या विधायक कार्याशी जोडणे आवश्यक आहे. चार-दोन मुलांनी पार्टी केली म्हणून सगळेच तसे आहेत असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु याची लागण होऊ नये, कोणीही तसे असू नये यासाठी प्रयास करणे मात्र गरजेचे आहे.
अमोल पुसदकर
– 9552535813
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)