भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेटवून देणाऱ्या रावेर तालुक्यातील लोहारा येथील आरोपी पतीला भुसावळ न्यायालयाने जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली.
असा आहे खटला
रावेर तालुक्यातील लोहारा येथील आरोपी रफिक रशीद तडवी (३३) हा पत्नी मर्जीना रफिक तडवी (२१, लोहारा ) हिच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता तसेच माहेरून रीक्षा घेण्यासाठी ५० हजार रुपये न आणल्याने छळ करीत असल्याने दोघांमध्ये खटके उडत होते व या वादातून २०१९ मध्ये आरोपीने पत्नीला रॉकेल टाकून पेटवून दिले होते. याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी आरोपीविरोधात फिर्याद दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यांची साक्ष ठरली महत्त्वाची
भुसावळ सत्र न्यायालयाचे न्या. आर. एम. जाधव यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यात मयत विवाहितेचे आई-वडील व आरोपीसोबत असलेला रीक्षा चालक तसेच तपासाधिकारी आर. टी. वाघ यांची साक्ष नोंदवण्यात आली व ती महत्त्वाची ठरली. न्यायालयाने ३०२ प्रमाणे जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता प्रवीण पी. भोंबे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शेख रफिक शेख कालू यांनी सहकार्य केले.