चार हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका धुळे एसीबीच्या जाळ्यात

धुळे:  गटविमा योजनेचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेला धुळे एसीबीने मंगळवारी दुपारी अटक केली. या कारवाईने शैक्षणिक क्षेत्रातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली. अर्चना बापूराव जगताप (39, रा.अभिनव रो हाऊस क्रमांक 10, गुलमोहर हाईट्सच्या मागे, मखमलाबाद रोड नाशिक) असे अटकेतील आरोपी मुख्याध्यापिकेचे नाव आहे.

 असे आहे लाच प्रकरण

59 वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचे गट विमा योजनेचे एक लाख 33 हजारांचे देयक हे प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांनी मंजूर केले होते. या देयकाचे आहरण व संवितरण करण्याचे काम मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांच्याकडे होते. त्यामुळे तक्रारदार यांनी वेळोवेळी जगताप यांच्याकडे  पाठपुरावा केला असता जगताप यांनी पाच हजार रुपये लाच मागितली व चार हजारात तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी

हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.