चाळिशीनंतर करा डोळ्यांची तपासणी; अन्यथा येऊ शकते अंधत्व

१० ते १६ मार्च हा जागतिक काचबिंदू सप्ताह पाळत असल्याने या आजाराबाबत जनजागृती करण्यात येते. हा आजार आपल्याला दृष्टिहीन बनवू शकतो. चोर पावलांनी येणारा हा आजार आपली नजर कधी चोरतो ते कळत नाही म्हणून काचबिंदूला ‘नजरेचा चोर’ असे म्हणतात. काचबिंदूवरील उपचाराचा आणि त्यावर सुरू असलेल्या संशोधनाचा घेतलेला आढावा. काचबिंदू हा डोळ्यांच्या मज्जातंतूवर परिणाम करणारा व पर्यायाने अंधत्वाकडे नेणारा डोळ्यांचा गंभीर आजार आहे. काचबिंदूचे निदान लवकर झाल्यास आणि योग्य ते उपचार आणि खबरदारी घेतल्यास समाधानकारक दृष्टी टिकवून ठेवता येणे शक्य आहे. डोळे हा मृदू अवयव असल्याने त्याचा आकार व्यवस्थित ठेवण्यासाठी या अवयवाच्या आत असणाऱ्या द्रवरूप पदार्थ एका ठरावीक पातळीपर्यंत नियंत्रणात असावे लागते. त्यामुळेच डोळ्याचे कार्य निर्विवादपणे चालू राहते. यालाच डोळ्याचे प्रेशर म्हणतात. हे प्रेशर वाढल्यास डोळ्याच्या मागील मेंदूपासून येणारी नस कमजोर पडत जाते.

नेत्रदाब म्हणजे काय?

डोळ्यातल्या आतल्या अवयवांचे पोषण करण्यासाठी डोळ्याच्या सर्वात मधल्या स्तरामधून अतिशुद्ध द्रवपदार्थ एकसारखा स्रवत असतो. या द्रवपदार्थाचे कार्य संपल्यावर विविध प्रणालीच्या माध्यमातून तो द्रवपदार्थ शोषला जातो. ज्याक्षणी हा समतोल बिघडेल त्या क्षणी डोळ्याचा दाब वाढण्यास सुरुवात होते. म्हणजे हा द्रवपदार्थ जास्त प्रमाणात पाझरला तरी दाब वाढतो किंवा असणाऱ्या द्रवपदार्थाच शोषण नीट नाही झाले तरी नेत्रदाब वाढतो. नेत्रदाब प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास त्याचा दुष्परिणाम चेतातंतूवर होतो आणि लगेचच अंधत्व येते. हाच दाब जर थोड्या प्रमाणात वाढला असेल तर त्याचा दुष्परिणाम हळूहळू होतो. त्यामुळे अंधत्वदेखील येण्याची शक्यता असते. यासाठी योग्यवेळी आणि सातत्याने काचबिंदूवर उपचार करण्याची आवश्यकता असते. काचबिंदूसाठी विविध तपासण्या नेत्रतज्ज्ञांकडून वेळच्या वेळी तपासणी करून घेणे आवश्यक असते. यामध्ये पुढील चाचण्या घेतल्या जातात.

अ) डोळ्यांच्या आतमध्ये असणाऱ्या दृष्टीनाडीचे परीक्षण करणे. ब) नेत्रदाब तपासणे – हवेचा सूक्ष्मझोत डोळ्यावर सोडून अथवा डोळ्यामध्ये बधिर करण्याचे थेंब टाकून एका लहानशा यंत्राद्वारे हळुवारपणे नेत्रदाब मोजला जातो. क) दृष्टीचा परीघ तपासणे या तपासणीमध्ये व्यक्तीला एका घुमटाकार यंत्राच्या एका बाजूला बसवले जाते. हनुवटी एका आधारावर ठेवून त्या घुमटामध्ये ठरावीक पद्धतीने प्रकाशाचे ठिपके दाखविले जातात.

भारतात अंधत्वाचे तिसरे प्रमुख कारण काचबिंदू आहे. यामुळे कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते. काचबिंदूमुळे परिधापासून अंधत्व येण्यास सुरुवात होते आणि पुढे-पुढे केवळ डोळ्यासमोरील नजर शिल्लक राहते. दृष्टीनाडीमध्ये कमजोरी येऊ लागते. पर्यायाने अंधत्व येते. म्हणूनच या काचबिंदू सप्ताहामध्ये आपले डोळे तपासून काचबिंदू नसल्याची खात्री करून घ्या.

 

-डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ, जळगाव

९४२३१ ८७४८६