चाळीसगाव: कजगाव येथील साहित्यिक सुनील गायकवाड लिखित डकैत देवसिंग भील के बच्चे या कादंबरीला प्यारा केरकट्टा फौंडेशन रांची (झारखंड)कडून दिला जाणारा पहिला जयपाल, जूलियस, हन्ना पुरस्कार देण्यात आला.
आदिवासी लिखित आदिवासींच्या दर्जेदार साहित्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूप निर्माण व्हावे, ते साहित्य कागदावर न राहता प्रकाशित रूपात पोहचावे या उद्देशाने प्यारा केरकट्टा फाउंडेशनच्या माध्यमातून देशात प्रथमच आदिवासी साहित्यिकारांच्या अप्रकाशित साहित्य कृतीचे आवाहन करून देशातून काव्य, कथा, कादंबरी या प्रकारातील अप्रकाशित साहित्यकृती मागविल्या होत्या. त्यात कजगाव येथील ब. ज. हिरण विद्यालयातील शिक्षक तथा भवाली, ता. चाळीसगाव येथील साहित्यिक सुनील गायकवाड यांच्या डकैत देवसिंग भील कें बच्चे या हिंदी कादंबरीची निवड जयपाल जूलियस हन्ना पुरस्कारासाठी करण्यात आली. 6 नोव्हेंबर रोजी प्रेस क्लब हॉल रांची (झारखंड) येथे सुनील गायकवाड यांना जूलियस तिग्गा साहित्यकार झारखंड यांच्या नातं डायस तिग्गा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 25 हजारांची प्रकाशित पुस्तके व रॉयल्टी स्वरूप 25 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी प्यारा केरकट्टा फाउंडेशन रांची व टाटा मॉंटीलीगल लंडन (इंग्लंड)चे प्रतिनिधी व देशातील निवडक आदिवासी साहित्यिक उपस्थित होते. काश्मीरमधील बक्करवाला जनजातीचे साहित्यिक जान मोहंमद हकिम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात वंदना टेटे, ए. कें. पंकज, सुंदर हेब्रम, अनुज लुगुन, सुमित्रा बडनाईक, मृदुला, निकोल तीराया डॉ. जुदिथ मिश्रा रोमन लोन्कु, सरोज तिग्गा यांच्यासह झारखंड येथील साहित्यिक उपस्थित होते.