चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १३३ कोटींचे भरघोस अनुदान मंजूर : आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव : खरीप हंगाम सन २०२३-२४ महाराष्ट्र राज्यातील ४० तालुक्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात आला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव चाळीसगाव तालुक्याचा समावेश झाल्याने दुष्काळी तालुक्यांसाठी असणाऱ्या विविध सोयी सवलती चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लागू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई खात्यात जमा झाली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. यासाठीदेखील आमदार चव्हाण यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता, त्याला यश मिळाले असून नुकताच राज्य शासनाने या ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी मदतीचा शासन निर्णय प्रकाशित केला आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार ४७१ शेतकऱ्यांना जवळपास १३३ कोटी १९ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे.

महिन्याभराच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे शासन निर्देश असल्याने चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार शेतकऱ्यांना गेल्या दुष्काळात मोठा आधार मिळणार आहे. आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्याला आतापर्यंत प्राप्त दुष्काळी अनुदानांमध्ये १३३ कोटी ही आजवरची सर्वात मोठी मदत मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मदतीची मर्यादा आता २ हेक्टरवरून ३ हेक्टरवर
राज्य शासनाच्या धोरणानुसार आतापर्यंत कुठलीही नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांना २ हेक्टरपर्यत मर्यादेत मदत दिली जात होती. त्यामुळे २ हेक्टरपेक्षा जास्त पाठीशी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र आता राज्य शासनाने आपले धोरण बदलले असून मदतीची मर्यादा २ हेक्टरवरून ३ हेक्टर केली आहे. तसेच प्रति हेक्टरी अनुदानदेखील भरघोस वाढविल्याने शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. त्यात बहुवार्षिक पिके २२५००/- प्रति हेक्टर, बागायत १७५००- प्रति हेक्टर, कोरडवाहू ८५००/- प्रति हेक्टर अशा वाढीव दराने शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येईल.