जळगाव : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या निमित्ताने १६ जानेवारी ते २० जानेवारी अशा पाच दिवशीय प्रभू श्रीराम महा शिवपुराण कथेचे चार जिल्ह्यांच्या सीमेवर चाळीसगाव येथे मालेगाव रोडवर आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य पंडीत श्री प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांची ४० एकर क्षेत्रावर ही कथा होत असून १० एकर जागेवर ८ ठिकाणी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे. खासदार उन्मेश पाटील यांनी १४ रोजी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर उपस्थित होते. कथेचे यजमान खासदार उन्मेश पाटील तसेच संपदा उन्मेश पाटील हे आहेत. दररोज दुपारी २ ते ५ वाजता कथा होईल. संकटमोचन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनात अतिशय कमी वेळेत या कथेचे अतिशय चांगल्या पध्दतीने नियोजन केले आहे. ५०० स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत, अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली. कथेसाठी दररोज ७ ते ८ लाख भाविक उपस्थित असतील, त्यानुसार मंडपाची ४० एकरात उभारणी केली जात आहे. पाचोरा, पारोळा, जळगाव, कन्नड, धुळे, मालेगाव, नादंगाव या मार्गावर १० एकर जागेवर ८ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था वाहनांसाठी तयार केली आहे. मान्यवरांसाठी विशेष सन्मानिका वितरित केली जात आहे.
१६ हजार स्वयंसेवकांनी नोंदविले नाव
गुगलच्या माध्यमातून तब्बल १६ हजार तरुणांनी स्वच्छेने स्वयंसेवक म्हणून कथेसाठी सामावून घेण्यासाठी नावे नोंदणी केली आहे. ते पिण्याचे पाणी, स्वच्छता, पार्किंग, अन्नदान
इत्यादी सेवा देण्यासाठी असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली. रेल्वेस्टेशन तसेच बसस्थानक याठिकाणाहून दीड किलो मिटर अंतरावर कथेचे ठिकाण असल्याने भाविक सहज येवू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कथेसाठी भाजपाच्या भागवत कराड, भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांना निमंत्रित केले असून या कथेला जिल्ह्यातील तिन्ही मंत्री, ११ आमदार तसेच खासदार यांचे सहकार्य लाभल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.कथास्थळी रात्री किर्तन, भजन तसेच प्रवचन होईल. बाहेरुन येणाऱ्या दोन ते तीन लाख भाविकांची थांबण्याची तसेच भोजनाची व्यवस्था केली आहे. कथेसाठी चाळीसगाव तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, पदाधिकारी तसेच मान्यवर असे ४० हजार जणांना आमत्रंण दिले आहे. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार या कथासोहळ्याचे नियोजन तसेच सूचनांचे पालन केले जात आहे, असे खासदार पाटील म्हणाले.
राममंदिराचा संपला वनवास – हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर
२२ जानेवारीला रामलल्लाची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे ५०० वर्षापासूनचा राममंदिराचा वनवास संपला. याच अनुषंगाने चाळीसगाव येथे प्रभू श्रीराम महाशिवपुराण कथेचे कमी वेळेत चांगल्या पध्दतीने नियोजन केले आहे. शिव हे प्रभू श्रीरामांचे आराध्य दैवत असल्याने या कथेला अनन्यमहत्व असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी यावेळी सांगितले.
२ लाख दिव्यांनी साकारेल राममंदिराची प्रतिकृती
कथास्थळी २ लाख दिव्यांच्या सहाय्याने अयोध्या येथील राममंदिराची प्रतिकृती कला साकारली जाणार आहे. जे वर्ल्ड रेकार्ड होईल. या कथेचे हे खास आकर्षण असेल. हा कथा सोहळा अध्यात्मतेचा जागर कुंभ असेल. कथा आटोपत्यानंतर ही प्रतिकृती भाविकांसाठी पाहण्यास खुली असणार आहे, अशी माहिती खा. उन्मेश पाटील यांनी दिली.